सर्दी, खोकल्याच्या औषधांची विक्री घटली, कारण काय

वाढत्या लसीकरणाच्या वेगाने माणसाच्या शरीरात रोगप्रतिकारकशक्ती वाढत असल्याने सर्दी, खोकल्याच्या औषधांच्या विक्रीला फटका बसला आहे. गेल्या तीन महिन्यात सर्दी, खोकल्याचे सिरप, गोळ्या तसेच विक्सचीही विक्री झालेली नसल्याचे सर्वेक्षणाअंती समोर आले आहे. ऑल फूड एण्ड ड्रग लायसन्स हॉल्डर्स फाऊंडेशनच्यावतीने गेल्या तीन महिन्यांतील औषधांच्या खरेदी-विक्रीची माहिती घेतली गेली. त्यातही व्हारल आजारांच्या औषधांची ४० टक्क्यांनी घट झाल्याचे दिसून आले.

औषधांच्या विक्रीत घट 

या सर्व्हेक्षणासाठी औषधविक्रेते, फार्मा कंपन्या, रिटेलर्स अशा तब्बल शंभर जणांची मते जाणून घेतली गेली. गेल्या वर्षांच्या तुलनेत यंदाच्या उन्हाळ्यात तीन महिन्यात सर्दी, खोकल्याची किती औषधे विकली गेली, याबाबत फाऊंडेशनने मते जाणून घेतली. त्यापैकी ७३ जणांनी औषधविक्रीला फटका बसल्याची माहिती दिल्याचे फाऊंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अभय पांडे यांनी सांगितले. सर्दी नियंत्रणात राहावी म्हणून छाती व नाकावर लावण्यासाठी वापरले जाणारे विक्सही आता फारसे वापरले जात नसल्याची माहिती विक्रेता गटाकडून दिली गेली. लिबोसिप्रिझिम, सिलाटेस्ट या गोळ्याही विकल्या गेलेल्या नाहीत, अशी माहिती सर्वेक्षणातून मिळाली.

( हेही वाचा : Convent शाळांमध्ये डबे पोहोचवण्यास परवानगी द्या; मुंबई डबेवाला असोसिएशनचे मुख्यमंत्र्यांना पत्र )

गेल्या वर्षापासून लसीकरण मोहिम प्रामुख्याने सर्वच स्तरावर राबवली गेली. दोन लसीकरण डोस आणि बूस्टर डोसनंतर माणसाच्या शरीरात आता रोगप्रतिकारक शक्ती पुरेशा प्रमाणात तयार झाल्याने त्याचा उलट परिणाम औषधांच्या विक्रीवर झाल्याची कबुली पांडे यांनी दिली. हा ट्रेण्ड पाहता येत्या पावसाळ्यातील चार महिन्यांतही औषधांच्या विक्रीबाबत पांडे यांनी साशंकता व्यक्त केली. याबाबत पुन्हा चार महिन्यांतील औषधांच्या विक्रीबाबत माहिती घेण्यासाठी पुन्हा सर्वेक्षण घेतले जाईल, असेही पांडे म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here