कॉमेडियन स्टार राजू श्रीवास्तव यांचं निधन, वयाच्या 58 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

कॉमेडियन स्टार राजू श्रीवास्तव यांचं निधन झाले आहे. वयाच्या ५८ व्या वर्षी त्यांनी दिल्लीत अखेरचा श्वास घेतला. बऱ्याच दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. १० ऑगस्ट रोजी सकाळी व्यायाम करत असताना त्यांचा ट्रेड मिलवर तोल गेला आणि ते कोसळले. यानंतर त्यांना तत्काळ एम्समध्ये दाखल करण्यात आले होते.

दिल्लीतील एम्स रूग्णालयातील आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर तब्बल ४० हून अधिक दिवस ठेवण्यात आले होते. मात्र त्यांची प्रकृती त्यांना प्रतिसाद देत नव्हती. त्यांच्यावर अँजिओप्लास्टी ही शस्त्रक्रिया पार पडली होती. मात्र या उपचारादरम्यान, त्यांचे निधन झाले आहे. श्रीवास्तव यांनी गेल्या दोन दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. त्याच्या जाण्याने टेलिव्हिजन मनोरंजन तसेच बॉलीवूड विश्वाला मोठा धक्का बसला आहे.

कॉमेडी शोमधून मिळाली होती ओळख 

राजू श्रीवास्तव हे शोबिज इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव होते. १९९० च्या दशकांतील त्यांनी अनेक चित्रपट आणि शोमध्ये काम केले आहे. राजू श्रीवास्तव रिअॅलिटी शोमध्येही सहभागी झाले होते. ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या कॉमेडी शोमधून राजू श्रीवास्तव यांना ओळख मिळाली होती. या शोला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसादही मिळाला होता. पहिल्या लाफ्टर चँलेजचे विजेतेपद हे सुनील पालने मिळवले होते. मात्र राजू श्रीवास्तव सगळ्यात लक्षवेधी ठरले होते. राजू यांनी त्या शोमधून अमाप लोकप्रियता मिळवली. घराघरात त्यांचे नाव झाले. ते प्रेक्षकांच्या आवडीचा सेलिब्रेटी झाले होते. या शोच्या यशानंतर राजू श्रीवास्तव यांनी मागे वळून पाहिलेच नाही. राजू श्रीवास्तव एक अभिनेता, विनोदी अभिनेताही आहेत. कोणत्याही गॉडफादरशिवाय राजू श्रीवास्तव यांनी इतके यश मिळवले हे पाहणे प्रेरणादायी असल्याचे म्हटले जात आहे.

राजू श्रीवास्तव यांच्या जाण्याने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला असून सोशल मीडियावर त्यांना त्यांच्या लाखो चाहत्यांनी आदरांजली वाहिली आहे. राजू हे केवळ विनोदी कलाकार म्हणूनच नाही तर एक माणूस म्हणूनही प्रेरणादायी होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here