इंग्लंडमधील बर्मिंगहॅम शहरात २८ जुलैला सुरू झालेल्या २२ व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची अखेर सोमवारी (८ ऑगस्ट) सांगता झाली. यावर्षीच्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने एकूण ६१ पदके जिंकून पदक तालिकेत चौथे स्थान मिळवले. यामध्ये २२ सुवर्ण, १६ रौप्य आणि २३ कांस्य पदकांचा समावेश आहे. पदक तालिकेत आॅस्ट्रेलिया, इंग्लंड, कॅनडा हे देश आघाडीवर राहिले.
(हेही वाचा – संजय राठोडांनी शपथ घेताच चित्रा वाघ यांनी केलं पहिलं ट्वीट; म्हणाल्या हे अत्यंत दुदैवी …)
यंदा कुस्ती, वेटलिफ्टिंग, बॉक्सिंग आणि बॅडमिंटनमध्ये भारतीय खेळाडूंनी अद्भुत कामगिरी केली. अॅथलेटिक्स आणि लॉन बॉलमध्येही भारतीय खेळाडूंनी चांगला खेळ केला. स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच समाविष्ट करण्यात आलेल्या महिला टी २० क्रिकेटमध्येही भारतीय संघाने चमकदार कामगिरी केली. याशिवाय पॅरा (दिव्यांग) खेळाडूंनीही अनेक पदके जिंकली. याच कारणामुळे नेमबाजांची अनुपस्थिती असतानाही भारताला ६१ पदके मिळवता आली.
भारताचे पदक विजेते खेळाडू
सुवर्ण पदक विजेते :
मीराबाई चानू, जेरेमी लालरिन्नुगा, अंचिता शेउली, महिला लॉन बॉल संघ, टेबल टेनिस पुरुष संघ, सुधीर (दिव्यांग खेळाडू), बजरंग पूनिया, साक्षी मलिक, दीपक पूनिया, रवि दहिया, विनेश फोगट, कुस्तीपटू नवीन, भाविना पटेल, नीतू घांगस, अमित पंघाल, एल्डहोस पॉल, निखत झरीन, शरथ कमल-श्रीजा अकुला, पीव्ही सिंधू, लक्ष्य सेन, सात्विकसाईराज-चिराग शेट्टी, अचंता शरथ कमल
रौप्य पदक विजेते :
संकेत सरगर, बिंदियारानी देवी, सुशीला देवी, विकास ठाकुर, भारतीय बॅडमिंटन संघ, तूलिका मान, मुरली श्रीशंकर, अंशु मलिक, प्रियंका गोस्वामी, अविनाश साबळे, पुरुष लॉन बॉल संघ, अब्दुल्ला आबुबेकर, शरथ कमल- जी साथियान, महिला क्रिकेट संघ, सागर अहलावत, पुरुष हॉकी संघ
कांस्य पदक विजेते :
गुरुराजा पुजारी, विजय कुमार यादव, हरजिंदर कौर, लवप्रीत सिंग, सौरव घोषाल, गुरदीप सिंग, तेजस्विन शंकर, दिव्या काकरन, मोहित गरेवाल, जॅस्मिन लांबोरिया, पूजा गहलोत, पूजा सिहाग, मोहम्मद हुसामुद्दीन, दीपक नेहरा, रोहित टोकस, महिला हॉकी संघ, संदीप कुमार, अन्नू राणी, सौरव घोषाल-दीपिका पल्लीकल, किदांबी श्रीकांत, त्रिषा जॉली-गायत्री गोपीचंद, जी साथियान
खेळांसाठी झाला सुमारे ७४ अब्ज खर्च
इंग्लंडमधील बर्मिंगहॅम शहरात अलेक्झांडर स्टेडियमवर ११ दिवस ही क्रीडा स्पर्धा खेळवली गेली. या कालावधीमध्ये पार पडलेली ही स्पर्धा, ऑलिंपिकनंतरची इंग्लंडमधील सर्वांत मोठी क्रीडा स्पर्धा ठरली. बर्मिंगहॅममध्ये आयोजित केलेल्या या खेळांसाठी सुमारे ७७८ दशलक्ष पौंड (सुमारे ७४ अब्ज) खर्च झाला आहे.
गेल्या ६४ वर्षांत भारताला मिळाली २०० सुवर्ण पदके
१९५८ ते २०२२ या ६४ वर्षांच्या कालावधीत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला २०० सुवर्ण पदके मिळाली आहेत. ही देशासाठी खचितच अभिमानास्पद कामगिरी आहे. दिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांनी १९५८ च्या राष्ट्रकुल खेळांमध्ये भारताला पहिले सुवर्ण मिळवून दिले होते. त्यानंतर बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधूने २०२२ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण जिंकल्याने या खेळांमधील भारताच्या सुवर्णपदकांची संख्या २०० वर गेली.
१९९८ नंतर झालेल्या स्पर्धेतील भारताची पदक कमाई
२०१८ मध्ये गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने एकूण ६४ पदकांची कमाई केली होती. त्या आधी २०१० मध्ये दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने आतापर्यंतची सर्वांत दमदार कामगिरी केली होती. त्यावेळी भारताने १०१ पदके मिळवत पदक तालिकेत दुसरे स्थान पटकावले होते. २००६ मध्ये मेलबर्नमधील स्पर्धेत ५० पदके पटकावत पदक तालिकेत चौथे स्थान, २००२ मध्ये मँचेस्टरच्या स्पर्धेत ६९ पदके पटकावत पदक तालिकेत चौथे स्थान, तर १९९८ मध्ये क्वालालांपूरात २५ पदके पटकावत पदक तालिकेत सातव्या स्थानावर होता.
Join Our WhatsApp Community