लम्पी आजारामुळे मृत्यू पावलेल्या जनावरांच्या पशुपालकांना मिळणार नुकसान भरपाई

लम्पी त्वचारोगाचा संसर्ग टाळण्यासाठी जिल्ह्यात लसीकरणाचा वेग वाढवल्यामुळे लम्पी त्वचा रोग नियंत्रणात आहे. या रोगाने बाधित पशुधनावरील उपचाराचा सर्व खर्च राज्य शासनामार्फत मोफत करण्यात येत असून लसीकरण, उपचार व शवविच्छेदन या सेवा पशुसंवर्धन विभागामार्फत मोफत दिल्या जात आहेत. जिल्हा नियोजन समितीमार्फत प्रत्येक जिल्ह्यास १ कोटी निधी तातडीने उपलब्ध करण्यात आला आहे. या रोगामुळे मृत जनावरांच्या पशुपालकांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. समीर तोडणकर यांनी दिली आहे.

या रोगाने मृत पावलेल्या जनावरांच्या पशुपालकास नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. यामध्ये दुधाळ जनावरांसाठी ३० हजार रुपये, ओढकाम करणाऱ्या जनावरासाठी २५ हजार आणि मृत वासरासाठी १६ हजार रुपये भरपाई मिळणार आहे, असे त्यांनी सांगितले आहे.

( हेही वाचा: शिंदे यांनी असं काय केलं जे बाळासाहेब, उद्धव आणि आदित्यला जमलं नाही, वाचा… )

लम्पी त्वचा रोगाचा प्रसार रोखण्याकरता सर्वत्र लसीकरण मोहीम

सध्या जिल्ह्यात एकूण २७ केंद्रबिंदू आहेत. एकूण १०४ जनावरे बाधित असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. ठाणे जिल्ह्यात एकूण ८०५३२ इतके गो-वर्गीय पशुधन असून त्यापैकी आतापर्यंत १६ हजार ९६५ जनावरांचे लसीकरणाचे काम पूर्ण झालेले आहे. लम्पी त्वचा रोगाचा प्रसार व हानी पाहता राज्य शासनामार्फत राबवण्यात आलेल्या विविध उपाययोजनांमुळे लम्पी त्वचा रोगनियंत्रणात आणण्यास पशुसंवर्धन विभागास यश येत आहे. लम्पी त्वचा रोगाचा प्रसार रोखण्याकरता सर्वत्र लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. सर्व जनावरांचे लसीकरण दि. ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. तोडणकर यांनी दिली आहे. पशुसंवर्धन आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली राज्यात शिघ्रकृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्हास्तरावर औषधांची ड्रग्ज बँक देण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय मंत्री महोदय यांनी जाहीर केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here