१२ हजार रुपये कमी मिळाल्याची तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या महिलेला आणि तिच्या सहकाऱ्यांना तुरुंगात जावे लागल्याचा प्रकार समोर आला आहे. या तक्रारीतून नवजात बालकाच्या विक्रीचे रॅकेट समोर आले असून पोलिसांनी या प्रकरणी आईसह ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे. हा प्रकार ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथे उघडकीस आला आहे.
असा घडला प्रकार
शीतल मोरे असे या आईचे नाव असून मूळची अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे राहणारी शीतल मोरे ही महिला सप्टेंबर महिण्यात शिर्डीतील एका खाजगी रुग्णालयात प्रसूत झाली होती. तिने एका मुलाला जन्म दिला होता, मात्र घरची गरिबी असल्यामुळे रुग्णालयाचे बिल भरण्यासाठी तिच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. त्यामुळे तिची मावशी कल्पना हिने रुग्णालयाचे बिल भरून तिला आणि तिच्या बाळाला रुग्णालयातून घरी घेऊन आली. “या गरिबीमध्ये तू मुलाचे पालन पोषण कसे करशील, तुझेच खाण्याचे वांदे असून मुलाला कशी संभाळशील आणि रुग्णालयाचा झालेला खर्च कसा परत करशील” असा प्रश्न मावशी कल्पनाने तिच्यापुढे प्रश्न मांडला. तसेच मुलाचे चांगले पालन पोषण होण्यासाठी आणि तुझी गरिबी दूर करण्यासाठी माझ्याकडे एक उपाय आहे. आपण हे मुलं विकून टाकू त्यातून तुला भरपूर पैसे मिळतील आणि तुझी गरिबी दूर होईल, असे मावशीने तिला सुचवले.
…आणि भिंग फुटले
मुलं विकण्यासाठी शीतल तयार होताच कल्पनाने कल्याण पूर्वेत राहणाऱ्या लक्ष्मी नावाच्या महिलेशी संपर्क साधला. यानंतर मावशी कल्पना आणि शीतल बाळाला घेऊन कल्याण पूर्व येथे लक्ष्मी या महिलेच्या घरी आले. बाळ विक्री करण्याचे ठरले आणि लक्ष्मी हिने ग्राहक बघून शीतलला तिच्या बाळाचे दोन लाख रुपये देण्याचे मान्य केले. दीपक सिंग नावाची व्यक्ती हे बाळ विकत घेणार होती तर या व्यवहारात कल्पना, लक्ष्मी कोंडले, इंदू सूर्यवंशी, अमोल व्हलेकर हे सहभागी झाले होते. मूल विक्री केल्यानंतर इंदूने लक्ष्मी मार्फत शीतलला १ लाख रुपयाची रक्कम दिली, त्यानंतर ६० हजार रुपये इंदूच्या खात्यावरून शीतलच्या खात्यावर वळते करण्यात आले व २८ हजार रुपये इंदूचा भाऊ अमोल यांच्या खात्यावरून शीतलला वळते करण्यात आले होते. असे एकूण १ लाख ८८ हजार रुपयाची रक्कम शीतलला तिचे बाळ विकून मिळाली होती. उर्वरित १२ हजार रुपये मिळावं म्हणून शीतलने इंदुकडे तगादा लावला होता. मात्र महिना उलटून देखील इंदूने शीतलला उर्वरित रक्कम १२ हजार दिले नाही म्हणून अखेर मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आणि सर्व बिंग फुटले आणि बेकायदा मूल विक्रीचा खळबळजनक प्रकार समोर आला.
(हेही वाचा – कोविड लसीकरणाची दशकोटींची मोहीम फत्ते)
सौदेबाजी करणाऱ्या ६ जणांविरोधात तक्रार
त्यामुळे पोलिसांनीही घटनेचे गांभीर्य ओळखून नवजात बालकाचा शोध घेतला असून सौदेबाजी करणाऱ्या ६ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस उप निरीक्षक गणेश सिताराम मुसळे यांच्या तक्रारीवरून कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता बालकाची विक्री केल्याने आईसह सहा जणांवर तक्रार दाखल करून त्यांच्याकडील नवजात बालक ताब्यात घेतले.
Join Our WhatsApp Community