विदर्भात आतापर्यंत बारा माणसे मारणा-या सिटी १ या वाघाला पकडण्यासाठी वनविभागाची गेल्या सहा महिन्यांपासून चांगलीच कसरत सुरू आहे. आठवड्याभरापूर्वी गडचिरोलीतून भंडा-यात दाखल झालेल्या या वाघाने काही दिवसांपूर्वीच भंडा-यातही एका माणसावर हल्ला केला. या हल्ल्यात माणसाचा जीव गेल्याने सिटी १ या वाघाच्या नोंदीत आतापर्यंत बारा माणसे मारण्याचा रॅकोर्ड नोंदवण्यात आला आहे.
वनाधिका-यांसाठी डोकेदुखी
सिटी१ माणसांना मारल्यानंतर संबंधित जागाच सोडून पळून जातो. १२ माणसांवर हल्ले झालेल्या गडचिरोली, गोंदिया, भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील वनाधिका-यांसाठी आता सिटी१ वाघाला पकडणे ही मोठी डोकेदुखी झाली आहे. रविवारी सकाळी सिटी१ पुन्हा वडसा भागातच परतल्याने गडचिरोलीचे वनाधिकारी पुन्हा कामाला लागले आहेत. गणपतीत माणसाला मारल्यानंतर ऐन नवरात्रोत्सवात सिटी१ पुन्हा वडसात परतल्याने वनाधिका-यांनी त्याला पकडण्याची जोमाने तयारी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
(हेही वाचाः ११ माणसांना मारून वाघाची जंगलात उडी; सीटी१ आणि टी२ची जमली जोडी!)
जंगलात जाणा-यांवरच हल्ला
गडचिरोलीत सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला वडसा येथील देसाईगंज येथे जंगलात गेलेल्या इसमाला सिटी१ वाघाने ठार केले होते. आतापर्यंत या वाघाच्या हल्ल्यात ठार झालेली माणसे बेकायदेशीररित्या जंगलात गेली होती. वाघाचे हल्ले जंगलात गेलेल्या माणसांवरच झाले आहेत त्यामुळे वाघाला दोष देऊ नका, असा मुद्दा प्राणीप्रेमींनी मांडला आहे.
शोध मोहिमेला वेग
दरम्यान, सिटी१ माणसांवर हल्ला केल्यानंतर संबंधित जंगल काही काळानंतर सोडून नव्या ठिकाणी जातो. १८ सप्टेंबर रोजी सिटी१ने वडसा सोडले. सिटी१ भंडा-यात आल्याचे कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून वनाधिका-यांना समजले. गुरुवारी भंडा-यातील जंगलक्षेत्रात चोरुन मासेमारी करायला गेलेल्या इसमावर सिटी१ने हल्ला केला. कॅमेरा ट्रॅपमुळे हल्लेखोर वाघ सिटी१ असल्याचेच वनाधिका-यांना समजले. वनाधिका-यांनी सिटी१ ला शोधण्यासाठी शोध मोहीम वेगाने सुरु केली.
(हेही वाचाः आता हल्लेखोर वाघावर लक्ष ठेवण्यासाठी ‘थर्मल ड्रोन’)
सीटी1 ची पळापळ
मात्र, शुक्रवार रात्रीपासून सिटी१ने आपला मुक्काम पुन्हा हलवला. सिटी१ शनिवारी वडसा सीमारेषेवर येत असल्याचे वनाधिका-यांच्या लक्षात आले. सिटी१ सहजासहजी पिंज-यात अडकत नाही. एखाद्या ठिकाणी फार काळ तो टिकत नाही. सहा वर्षांच्या सिटी१ ला संबंधित जंगलात अगोदरच ठाण मांडून बसलेल्या वाघाची भीती आहे. एखाद्या भागात फार काळ न टिकण्यामागे अगोदरपासूनच वावर असलेल्या वाघांसोबत प्रादेशिक वाद करण्यास सिटी१ जाणूनबुजून टाळत आहे.
प्रादेशिक वाद
वडसा सोडून भंडा-यात जाण्यामागेही या भागांत वर्चस्व असलेल्या टी१ वाघाचे कारण असावे, असा वन्यजीव अभ्यासकांचा अंदाज आहे.टी१चे वय दहावर्षांपलीकडे आहे. वयात आलेला सिटी१, टी१ वाघाशी सहज प्रादेशिक वादावर हक्क प्रस्थापित करण्यासाठी लढू शकतो. तरीही सिटी१ची एका जागेवरुन तिन्ही जिल्ह्यांच्या सीमारेषांवरुन सुरु असलेली उडी वनाधिका-यांसाठी डोकेदुखी ठरली आहे.
Join Our WhatsApp Communityपावसामुळे गडचिरोली जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती सिटी१ ला पळून जाण्यास पोषक ठरली आहे. जंगलात एक फूटांपलीकडचे दृश्य व्यवस्थित दिसत नाही. पावसाळ्याच्या चार महिन्यांत कोणत्याही प्राण्याला पकडताना भौगोलिक परिस्थिती आव्हानात्मक ठरते. सिटी१ला कोणत्याही परिस्थितीत पाच दिवसांच्या आत पकडण्याची
व्यूहरचना केली जात आहे.
-सिटी१ शोधमोहिमेतील वनाधिका-यांची टीम