चंद्रपूरात वाघांच्या वाढत्या हल्यात महिन्याभरात पाचव्यांदा वाघाला जेरबंद करण्यात वनाधिकाऱ्यांना यश आले. डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात ब्रह्मपुरीत झालेल्या हल्ल्यातील वाघ बुधवारी सकाळी वनाधिऱ्यांनी जेरबंद केला. या वाघाला पकडण्यासाठी वनाधिकाऱ्यांनी महिनाभर ७-८ वेळा पाळीव प्राणी बांधून त्याला पकडण्याची योजना (बेट) केली होती. वाघाने प्रत्येक वेळेला प्राणी खाल्ला परंतु वनाधिका-यांच्या बेशुद्ध करण्याच्या बंदुकीच्या निशाणीपासून तो वाचला. बुधवारी सकाळी बेशुद्ध करण्यात वनाधिका-यांना यश आले खरे परंतु त्याला उचलण्यासाठी वनाधिका-यांना चक्क क्रेनची मदत घ्यावी लागली.
अंदाजे साडेतीन वर्षांच्या वाघाने डिसेंबर महिन्याच्या दुस-या आठवड्यात माणसाचा बळी घेतला. या वाघाची कॅमेरा ट्रेपमधून ओळख पटल्यानंतर पटल्यानंतर वनाधिका-यांनी हल्लेखोर वाघाला पकडण्यासाठी बेट लावण्याची योजना केली. बकरी, गायीचे वासरु पकडून एका विशिष्ठ ठिकाणी ठेवल्यानंतर वनाधिकारी वाघाला पकडण्यासाठी सापळा रचायचे. हल्लेखोर वाघ मात्र इतर वेळीच बकरी, गायीचे वासरु खायचा. २५ दिवस वनाधिकारी त्याला पकडण्याच्या प्रयत्नात होते. अखेरीस वाघाला बुधवारी सकाळी पकडताना वनाधिका-यांनी बेट लावल्याच्या ठिकाणी गाडीही उभी केली नाही. तरीही भक्ष्याला खाण्यापूर्वी वाघ त्याच्याजवळ अर्धा तास उभा राहिला. जवळपास कोणी नसल्याची खात्री झाल्यानंतरच वाघाने भक्ष्याला (बेट) पकडले. वाघ भक्ष्य खात असतानाच वनाधिका-यांनी त्याला बेशुद्ध करण्याचे इंजेक्शन मारले. वाघाला उचलून पिंज-यात ठेवताना मात्र वनाधिका-यांची चांगलीच कसरत झाली. १५-१६ जणांनाही वाघ उचलायला होईना. अखेरिस क्रेनच्या मदतीने वाघाला उचलून त्याला पिंज-यात ठेवले गेले.
चंद्रपूरात वाघांचे वाढते हल्ले लक्षात घेत पकडलेल्या वाघांना ठेवण्यासाठी पिंजरे कमी पडत आहेत. चंद्रपूरात ट्रान्झिट सेंटरमधील दोन वाघ दोन दिवसांपूर्वीच नागपूर येथील गोरेवाडा प्राणिसंग्रहालयातील रेस्क्यू सेंटरमध्ये हलवण्यात आले. सध्या चंद्रपूरातील ट्रान्झिटसेंटरमध्ये दोन वाघ आहेत. बुधवारी पकडलेला वाघ चंद्रपूरातील ट्रान्झिट सेंटरमधील पिंज-या ठेवण्यात आला. प्रत्यक्षात ट्रान्झिट सेंटरमध्ये केवळ दोनच वाघ ठेवण्याची क्षमता आहे. त्यामुळे चंद्रपूरातील हल्लेखोर वाघ ठेवायचे कुठे, हा मोठा प्रश्न वन विभागासमोर आहे. गोरेवाडा येथील प्राणिसंग्रहालय केंद्रात सध्या १९ वाघ आहेत. रेस्क्यू केंद्रात केवळ ११ वाघ ठेवण्याची क्षमता आहे.