काँग्रेसला फक्त करायचीय हवा

66

मुंबई महापालिकेतून विधान परिषदेत जाणाऱ्या दोन सदस्यांच्या जागेसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून सुनील शिंदे आणि भाजपकडून राजहंस सिंह यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर माजी नगरसेवक सुरेश कोपरकर यांनीही काँग्रेस पुरस्कृत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरत चुरस निर्माण केली आहे. काँग्रेसला या माध्यमातून केवळ हवा निर्माण करायची असून जे भाजपला शक्य झाले नाही ते आम्ही करून दाखवले, हे दाखवण्यासाठी कोपरकरांच्या माध्यमातून मराठी कार्ड बाहेर काढले. परंतु निवडणूक अर्ज मागे घेण्याच्या दिवशी कोपरकर हे उमेदवारी अर्ज मागे घेतील, असेही बोलले जात आहे. काँग्रेसला जर ही निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढायची असती तर त्यांनी कोपरकर यांच्याऐवजी वेगळा चेहरा दिला असता, असेही बोलले जात आहे.

भाजपकडून एका अमराठी उमेदवाराला उमेदवारी

विधान परिषदेवर जाणाऱ्या दोन सदस्यांच्या जागेकरता काँग्रेसच्यावतीने उमेदवार दिला जाणार नाही अशाप्रकारची चर्चा होती. परंतु काँग्रेसचे माजी नगरसेवक सुरेश कोपरकर यांनी उमेदवारी अर्ज भरत चुरस निर्माण केली आहे. सुरेश कोपरकर यांनी अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज भरला असला तरी ते काँग्रेस पुरस्कृत उमेदवार असल्याचे महापालिका विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी स्पष्ट केले. भाजपने एका अमराठी उमेदवाराला उमेदवारी दिली. पण काँग्रेस मराठी उमेदवाराच्या पाठिशी राहणार असून याबाबत पक्षाचे वरिष्ठ नेते हे पक्षाचे ज्येष्ठ माजी नगरसेवक असलेल्या कोपरकर यांना निवडून आणण्यासाठी रणनिती आखत असल्याचे सांगितले.

काँग्रेसने हवा निर्माण करण्यासाठी भरला उमेदवारी अर्ज

दरम्यान, सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार खासदार राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने माघार घेत ही निवडणूक बिनविरोध केली होती. तसेच सातव यांची पत्नीचीही विधान परिषदेवर बिनविरोध निवड झालेली आहे. त्यामुळे काँग्रेसने दबावतंत्र राबवण्यासाठी आपल्या उमेदवाराला अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उभे केले असले तरी यापूर्वीच्या राज्यसभा व विधान परिषदेतील बिनविरोध निवडणुकीत भाजपने घेतलेल्या भूमिकेचा विचार करता काँग्रेस पुरस्कृत कोपरकर यांना आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे काँग्रेसने केवळ हवा निर्माण करण्यासाठी व आपले अस्तित्व दाखवण्यासाठीही हा उमेदवारी अर्ज भरल्याचे बोलले जात आहे.

(हेही वाचा – अखेर ‘लालपरी’चे विलिनीकरण लटकले, मात्र कर्मचाऱ्यांना 41 टक्के पगारवाढ)

सध्या काँग्रेसचे २९, राष्ट्रवादी काँग्रेस ०८, समाजवादी पक्ष ०६, मनसे ०१ आणि एमआयएम ०२ अशाप्रकारे ४६ नगगरसेवक असून शिवसेनेने आपल्या उर्वरीत १९ नगरसेवकांची मते फिरवल्यास त्यांची संख्या ६५ पर्यंत जाणार आहे. त्यामुळे निवडून येणाऱ्या मॅजिक फिगरसाठी १४ मते कमी पडणार आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येचा फरक कमी पडणे शक्य नसल्याचे बोलले जात आहे. मात्र, भाजपच्या उमेदवाराला ७७ चा आकडा पार करता न आल्यास दुसऱ्या क्रमांकाच्या मतांची गरज भासेल आणि त्यामध्ये काँग्रेसचा उमेदवार निवडून येईल अशाप्रकारचा आशावाद काँग्रेसच्या नेत्यांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे एक गट हा उमेदवारी मागे न घेण्याचा विचाराचा असून प्रत्यक्षात काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या भूमिकेवरच सर्व अवलंबून असल्याचेही काँग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे पक्षाने आदेश दिल्यास कोपरकर अर्ज मागे घेतील किंवा ते न ऐकल्यास काँग्रेसचे नगरसेवक हे तटस्थ राहतील,असेही बोलले जात आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.