मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. अशातच आता राज्यसभेतही मराठी भाषेचा मुद्दा गाजला आहे. यावेळी काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील यांनी राज्यसभाध्यक्षांनाच साकडे घातले आहे. ते म्हणाले, ‘अध्यक्षजी, तुम्ही भारतीय भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करता. तुम्ही तुमचे वजन वापरून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यास मोदी सरकारला सूचना द्या.’ ही मागणी सादर करताना मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत पाटील यांनी मराठीतून केलेल्या भाषणाला नायडू यांनीही दाद दिल्याचेही दिसले.
(हेही वाचा –इस्रायलमध्ये कोविडच्या ‘या’ नव्या व्हेरियंटचं थैमान, वाचा किती आहे जीवघेणा?)
काय म्हणाल्या रजनी पाटील?
‘…तैसी भाषांमाजी साजिरी मराठिया‘ असे म्हणत पाटील म्हणाल्या, की साडेबारा कोटी लोकसंख्येच्या महाराष्ट्रात अनेक जातीधर्माच्या लोकांची बोलीभाषा मराठी आहे. मराठी ज्ञानी लोकांची, विद्वानांची , कष्टकऱ्यांची, धर्माची भाषा आहे. सारे निकष पूर्ण करूनही मराठीला अभिजात भाषेचा दर्जा केंद्राकडून अजूनही मिळत नाही. भारत सरकारने १५ वर्षांपूर्वी सर्वप्रथम तमिळला व नंतर संस्कृत, तेलुगु, कन्नड़, मल्याळम व ओडिशा या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला. मराठीमध्ये थोडथोडक्या नव्हे तर ५२ बोलीभाषा आहेत. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी २७ फेब्रुवारीला मराठी भाषा दिन साजरा केला जातो. यावर्षी त्या दिनाच्या निमित्ताने राज्यातील महाविकास आघाडी सरकारने याबाबत सांस्कृतिक मंत्र्यांना प्रस्ताव पाठविला आहे. राज्याच्या रंगनाथ पठारे समितीने तयार केलेला अहवाल केंद्र सरकारला मान्य असून याबाबत सरकारचे धोरण सकारात्मक असल्याचे केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांनी लोकसभेतही स्पष्ट केले आहे.
पाटीलांच्या भाषणानंतर नायडूंची मराठीतून दाद
तुम्ही ज्ञानी आहात. भारतीय भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही सातत्याने प्रयत्नही करत असता. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी तुम्ही आपले ‘वजन ‘वापरून केंद्राला तशी सूचना करावी, असे रजनी पाटील नायडूंना म्हणाल्या. त्यांच्या या टिप्पणीवर सभागृहात हास्यकल्लोल झाला. पाटील यांच्या भाषणानंतर नायडू यांनी मराठीतूनच दाद दिली, ते म्हणाले ‘तुमचे अभिनंदन. तुम्ही चांगले बोलला आहात’.
Join Our WhatsApp Community