शशी थरुरांवर अफवा पसरवण्याचा गुन्हा दाखल होणार का?

थरुरांनी खोटं बोला पण रेटून बोला, असा बाणा स्विकारला आहे का, असा प्रश्न सध्या सगळ्यांना पडला आहे.

71

शशी थरुर… काँग्रेसचे लोकसभा खासदार, लेखक आणि काँग्रेसच्या ‘थिंक टँक’ मधील एक ज्येष्ठ नेते म्हणून ओळखलं जाणारं व्यक्तिमत्त्व. शशी थरुर आजवर सभागृहात किंवा सार्वजनिकरित्या बोलताना खूपच अभ्यासपूर्ण बोलतात, असं म्हटलं जातं. त्यामुळे सोशल मीडियावरही त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. हा वर्ग त्यांच्या बोलण्याची गांभीर्याने दखल घेत असतो. पण थरुरांची सध्याची(कुठलाही आधार नसलेली) ट्वीट्स सोशल मीडियावर खूपच ‘थरार’ माजवत आहेत. त्यांच्या (खात्रीलायक) ‘सूत्रांनी’ त्यांना दिलेली आकडेवारी, सगळी ‘गणितं’ बिघडवत आहे. त्याचं झालं असं की, थरुरांनी ट्वीट करत अंदमान-निकोबार मधील कोरोना परिस्थिती फारच भीषण असल्याची माहिती दिली. त्यासाठी त्यांनी काही आकडेवारी सांगितली. पण त्यांनी दिलेली ही आकडेवारी खोटी असल्याचे भारत सरकारच्या पीआयबी फॅक्ट चेक विंगने म्हटले आहे. त्यामुळे अशाप्रकारे बिनबुडाची ट्वीट करुन समाजात अफवा पसरवणा-या शशी थरुर यांच्यावर कारवाई होणार का, असा सवाल आता विचारण्यात येत आहे.

काय आहे शशी थरुर यांचे ट्वीट?

10 मे रोजी शशी थरुर यांनी अंदमान-निकोबार मधील कोरोना परिस्थिती कशी भयानक होत चालली आहे, याबद्दल एक ट्वीट केले. त्यात त्यांनी,

अंदमानमधील कोविड परिस्थितीबद्दल ऐकून मी फार अस्वस्थ झालो आहे. तेथील जी. बी. पंत रुग्णालयात दररोज 4 ते 5 रुग्णांचा मृत्यू होत आहे. पण मृत्यूचे हे आकडे दडपण्यात येत आहेत. लक्षणे असलेल्या रुग्णांच्या चाचण्या होत नाहीत. तब्बल 4 लाख लोकांसाठी केवळ 50 व्हेंटिलेटर्सचीच सुविधा उपलब्ध  आहे. दुर्दैवाने या विषयावर प्रसारमाध्यम उदासिन आणि गप्प आहेत, याचे वाईट वाटते.

असे शशी थरुर यांनी या ट्वीटद्वारे म्हटले. पण याबाबत प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरो(पीआयबी)च्या फॅक्ट चेक विंगने थरुररांनी केलेला हा दावा खोटा असल्याचे सिद्ध केले.

हे आहे तथ्य

शशी थरुरांचा हा दावा खोटा आहे, हे सिद्ध करताना पीआयबीच्या फॅक्ट चेक विंगने अंदमान-निकोबारमधील काही आकडेवारी दिली आहे. अंदमान-निकोबारमधील कोरोना परिस्थितीबाबत काही खोटे दावे प्रचलित होत आहेत, असे पीआयबीने म्हटले आहे. तेथील कोरोना चाचण्यांच्या बाबतीत माहिती देताना, या बेटावर देशातील दहा लाख लोकांमागे सर्वाधिक चाचण्या करण्यात आल्या असल्याचे सांगण्यात आले. आतापर्यंत अंदमान-निकाबोर येथे एकूण 9 लाख 43 हजार 233 कोरोना चाचण्या पार पडल्याचे सांगण्यात आले आहे.

तर कोरोनाच्या दुस-या लाटेत 16 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच अंदमान-निकोबारमधील रुग्ण बरे होण्याचा दर(रिकव्हरी रेट) 96 टक्के इतका आहे. हा दर देशातील इतर सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशांपेक्षा सर्वाधिक असल्याचा खुलासा, पीआयबी फॅक्ट चेक विंगने केला. त्यामुळे यानंतर मोठी नामुष्की ओढवलेल्या थरुरांनी ट्वीटला उत्तर दिले.

असे आहे थरुरांचे उत्तर

पीआयबीने दिलेल्या या माहितीनंतर थरुरांनी उत्तर देत, आपली चूक लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.

आपण दिलेली माहिती ऐकून फार आनंद झाला. मला माझ्या ज्या सूत्रांनी ही माहिती दिली, ते अंदमान-निकोबार येथील सरकारी कर्मचारी आहेत. तेथील समस्यांवर राष्ट्रीय पातळीवर चर्चा करुन लक्ष वेधण्याची गरज असल्याची याचना त्यांनी माझ्याकडे केली. ते आपली ओळख सांगण्यास घाबरत आहेत, म्हणून मी त्यांना या प्रकरणाबाबत पुढे येण्यास सांगू शकत नाही. मी तुम्ही दिलेल्या माहितीला योग्य मानतो व माझ्या सूत्रांची माहिती चुकीची असावी, अशी आशा करतो.

असे उत्तर थरुर यांनी या ट्वीटला रिप्लाय करताना दिले आहे.

असे असूनही आतापर्यंत तरी थरुरांनी आपले चुकीची माहिती देणारे ट्वीट डिलीट केलेल नाही. त्यामुळे थरुरांनी खोटं बोला पण रेटून बोला, असा बाणा स्विकारला आहे का, असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.

याआधीही थरुरांच्या ट्वीटने उडवली खळबळ

22 एप्रिल रोजी रात्री थरुरांनी असेच एक खळबळजनक ट्वीट केले. त्यात त्यांनी माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या निधनाची माहिती देत, त्यांना चक्क श्रद्धांजली अर्पण केली. त्यामुळे ब-याच प्रसारमाध्यमांनी याबाबतची बातमीही प्रसारित करायला सुरुवात केली.

Sumitra Shashi 1 scaled 1

पण त्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते कैलाश विजयवर्गीय यांनी ट्वीट करत, सुमित्रा महाजन एकदम ठणठणीत असल्याचे सांगत, त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. तेव्हा थरुरांनी दिलेली माहिती खोटी असल्याचे सर्वांच्या आणि खुद्द थरुरांच्याही लक्षात आले. त्यानंतर त्यांनी आपले ट्वीट डिलीट केले.

पण काँग्रेस सारख्या पक्षातील एका जबाबदार नेत्याने कुठलीही तथ्य न पडताळता, अशाप्रकारची (खोटी)माहिती देण्याची घाई का करावी, असा संतप्त सवाल सध्या लोक करत आहेत. थरुरांचे नेमके ‘सूत्र’धार(बोलविते धनी) नक्की कोण आहेत, हे एक कोडेच आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.