काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते राजू वाघमारेंच्या भावाला बलात्काराच्या गुन्ह्यात अटक 

सुनीत वाघमारेला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने ५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली.

काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते तसेच माजी नगरसेवक राजू वाघमारे यांच्या भाऊ सुनीत वाघमारे याच्याविरुद्ध लोणावळा शहर पोलीस ठाण्यात बलात्कार, फसवणूक आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली असल्याची माहिती लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली. 

नोकरीचे आमिष दाखवत प्रेमाच्या जाळ्यात अडकवले!

सुनीत वाघमारे हा मुंबईतील नायगाव परिसरात राहतो. त्याच परिसरात राहणारी २८ वर्षांची तरुणी ही नोकरीच्या शोधात असताना सुनीतच्या संपर्कात आली होती. सुनीतने तिला नोकरीचे आमिष दाखवत तिच्याशी जवळीक साधून आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. दरम्यान पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत लोणावळ्यातील विविध गेस्ट हाउसमध्ये आणून मागील तीन महिने तिच्यावर बळजबरीने शारीरिक अत्याचार केला, त्यानंतर नको त्या अवस्थेत दोघांची छायाचित्रे काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत, कधी तिला आणि तिच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देऊन पीडितेचे वेळोवेळी शारीरिक शोषण केले, अशी तक्रार पीडित मुलीने काही दिवसांपूर्वी मुंबईतील भोईवाडा पोलीस ठाण्यात दिली होती.
५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी!
भोईवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून घटनास्थळी लोणावळा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याकारणाने सदर गुन्हा लोणावळा शहर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला होता. लोणावळा शहर पोलिसांनी गुन्ह्याची गंभीरता बघून ताबडतोब या गुन्ह्यातील आरोपी सुनीत वाघमारे याला ८ फेब्रुवारी रोजी मुंबईतून अटक केली असून त्याच्याविरुद्ध बलात्कार, फसवणूक आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान त्याला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने ५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली आहे. सुनीत वाघमारे हा काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते राजू वाघमारे यांचा भाऊ असला तरी त्याचा काँग्रेस पक्षाशी काही देण घेणे नसल्याचा खुलासा काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. २०१७ मध्ये झालेल्या महानगपालिकेच्या निवडणुकीत पक्षाच्या विरोधात काम केल्याप्रकरणी सुनीत वाघमारेला पक्षातून काढून टाकण्यात आले होते, असेही सावंत यांनी ट्विटरवर माहिती दिली आहे. 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here