विद्याविहार रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे पूलाच्या बांधकामांमध्ये आड येणाऱ्या १५ अनधिकृत बांधकामांवर महापालिकेच्या एन विभागाने धडक कारवाई केली. ही अनधिकृत बांधकामे तोडण्यात आल्याने या पुलाच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे.
महानगरपालिकेच्या पूल विभागाकडून रस्त्याचे काम
मुंबई महानगरपालिकेच्या ‘एन’ विभाग हद्दीमधील विद्याविहार (पूर्व) येथील १५ अनधिकृत झोपड्या या रेल्वे पुलाच्या बांधकामाच्या आड येत होत्या. ही बांधकामे तोडल्याने आता पूल विभागाच्या ताब्यात ही मोकळी जागा दिली असून याठिकाणी आता पूलाचे बांधकाम पूल विभागाच्यावतीने हाती घेण्यात येणार आहे.
एन विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली असून कनिष्ठ सहाय्यक अभियंता सचिन बेलदार व इतर अधिकारी, परिरक्षण विभाग यांनी टिळक नगर पोलिस ठाण्याच्या सहाय्याने निष्कासित करण्यात आल्या. या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेच्या पूल विभागाकडून रस्त्याचे काम करण्यात येणार असल्याचे सोनावणे यांनी स्पष्ट केले.
( हेही वाचा : महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी आशिष शर्मा यांची नियुक्ती)
मंगळवारी करण्यात आलेल्या कारवाईसाठी मुंबई पोलीस दलातील कर्मचारी घटनास्थळी तैनात होते. या कारवाईसाठी मुंबई महानगरपालिकेचे कामगार, कर्मचारी, अधिकारी देखील घटनास्थळी कर्तव्यावर उपस्थित होते. तसेच जे. सी. बी., पोकलेन यासारख्या यंत्रसामुग्रीचा वापरही या कारवाईदरम्यान करण्यात आला, अशी माहिती ‘एन’ विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय सोनवणे यांनी दिली आहे.
Join Our WhatsApp Community