जाणून घ्या, अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम किती झाले?

126

आज संपूर्ण देशभरात रामनवमीचा सोहळा उत्साहात साजरा होताना दिसतोय. यापार्श्वभूमीवर अयोध्येतील राम मंदिराच्या निर्माण कामासंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे अयोध्येतील प्रस्तावित राम मंदिर निर्माणाचे काम वेगाने सुरू असून, फेब्रुवारी महिन्यात मंदिराच्या पायाभरणीचे काम पूर्ण झाले आहे. येत्या जून महिन्यापासून गर्भगृहाच्या बांधकामाला सुरुवात होणार आहेत. २०२४ च्या जानेवारी महिन्यानंतर गर्भगृहात श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून पूजाअर्चा सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

(हेही वाचा – श्रीराम हिंदुस्तानचे राष्ट्रपुरुष!)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराचे भूमिपूजन झाल्यानंतर हैदराबाद येथील भूगर्भशास्त्रज्ञांच्या सल्ल्याने कामाला सुरुवात झाली. साडेतीन एकर जागेत ४५ मीटर खोलपर्यंत खणण्यात आले. तेथील एकूण १ लाख ८५ हजार घनमीटर माती बाजूला काढण्यात आली. त्यानंतर सिमेंट, गिट्टी, फ्लाय ॲश आणि रसायन यांच्या मिश्रणाने काँक्रीट तयार करण्यात आले. या मिश्रणाचे ४८ थर पायात भरण्यात आले. या प्रक्रियेला रोलर कॉम्पॅक्टेड काँक्रीट असे संबोधले जाते, अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय संघटन मंत्री आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे पदाधिकारी श्री गोपालजी यांनी दिली.

साडेसोळा फूट उंचीच्या चबुतऱ्यासाठी १७ हजार शिळा

सध्या चबुतऱ्याचे बांधकाम सुरू असून, साडेसोळा फूट उंचीचा हा चबुतरा असणार आहे. त्याखाली साडेचार फूट उंचीपर्यंत शिळा रचल्या जातील. अशी एकूण २१ फूट उंचीपर्यंत चबुतऱ्याची उंची असेल. त्यासाठी बंगळुरू येथील ग्रॅनाइट आणण्यात आले आहेत. या कामासाठी पाच फूट लांब, अडीच फूट रुंद आणि तीन फूट जाड अशा १७ हजार शिळा लागणार आहेत. चबुतऱ्याचे काम ऑगस्टपर्यंत पूर्ण केले जाईल, असे श्री गोपालजी यांनी सांगितले.

कशी असणार मंदिराची रचना, वाचा…

मंदिर परिसरात चबुतऱ्यावर तीन मजली बांधकाम केले जाणार आहे. प्रत्येक मजला २० ते ३० फूट उंचीचा असेल. बांधकामासाठी पिंक सँड स्टोनचा वापर होणार आहे. मंदिराच्या आजूबाजूला चारही दिशांना २५ ते ३० फूट अंतरावर प्रदक्षिणा मार्ग तयार केला जाणार आहे. याशिवाय मंदिर परिसरात छोटी गोशाळा, यज्ञ मंडप, अनुष्ठान मंडप आणि म्युझियम यांचीही उभारणी केली जाणार आहे.या सर्व गोष्टी पूर्ण होण्यासाठी किमान तीन वर्षे लागणार असल्याची माहिती मिळतेय.

मंदिर उभारणीसाठी ३३०० कोटी निधीचे संकलन

या मंदिर उभारणीच्या कामासाठी साधारण ३३०० कोटी निधी संकलन करण्यात आला आहे. मंदिराची एकूण उंची १६१ फूट
२१ फूट उंचीपर्यंत चबुतऱ्याची उंची असणार असून एकूण १५० मजूर या ठिकाणी काम करत आहेत. याशिवाय एल अँड टी आणि टाटा कन्सल्टन्ट्सचे अभियंतेही मंदिर निर्माणाच्या कार्यात आहेत. अस्थायी मंदिरात दररोज किमान २० हजार भाविक दर्शनासाठी येतात. या मंदिरात राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांच्या मूर्ती दर्शनासाठी आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.