मुंबईतील पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आता अंधेरीपासून मालाडपर्यंत सागरी किनारपट्टीलगत उड्डाणपूल बांधण्यात येणार असून, या पुलांच्या बांधकामांसाठी महापालिकेच्यावतीने सल्लागाराची नेमणूक करण्यात आली आहे. सहा पुलांच्या बांधकामांसाठी टंडन अर्बन सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची सल्लागार म्हणून निवड करण्यात आली आहे. यासाठी १ कोटी ६१ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.
सहा नवीन पुलांची होणार उभारणी
मुंबई शहरातील पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अस्तित्वात असलेल्या किनारपट्टी लगतच्या भूमीला उड्डाणपूल बांधण्याकरता विविध प्राधिकरण म्हणजे पर्यावरण विभाग, वन मंत्रालय, सागरी मंडळ, महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अॅथॉरिटी व इतर संलग्न विभागांची मंजूरी घेण्यासाठी या सल्लागाराची नेमणूक करण्यात आली आहे. पुढील दहा महिन्यांमध्ये सल्लागार कंपनी महापालिकेला उड्डाणपुलांच्या बांधकामांबाबतची मदत करणार आहे. महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी सन २०२१-२२च्या अर्थसंकल्पात या सहाही नवीन पुलांच्या उभारणीची घोषणा केली आहे. या पुलांच्या कामांकरता पर्यावरण व वन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर, तात्काळ याची निविदा मागवण्यात येईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. त्याच अनुषंगाने या सल्लागाराची निवड करण्यात आल्याची माहिती पूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
(हेही वाचाः शाळांची स्वच्छता की महापालिकेच्या तिजोरीची साफसफाई? शाळा बंद असूनही कोट्यावधींचा खर्च!)
सल्लागाराच्या कामाचे स्वरुप
- पर्यावरण अभ्यास तसेच पर्यावरण व वन मंत्रालयाकडून कामाची मंजुरी मिळवणे.
- इतर सरकारी यंत्रणांकडून मंजूरी प्राप्त करणे.
- कंत्राटदारांच्या नियुक्त करण्याच्या निविदा बनवणे.
- भारतीय सागरी मंडळ व संलग्न विभागाची मंजुरी प्राप्त करणे.
- संरक्षण विभागाची व संलग्न विभागाची मंजुरी घेणे.
- न्यायालयीन मंजुरी प्राप्त करणे.
कोणत्या पुलांसाठी या सल्लागाराची मदत घेणार
के-पश्चिम आणि पी-उत्तर विभागातील मढ-वर्सोवा खाडी पूल.
पी-उत्तर विभागातील मार्वे मनोरी पूल.
के-पश्चिम, पी-दक्षिण व पी-उत्तर विभागातील मालाड खाडीवरील ओशिवरा नदी ओलांडणारा पूल.
पी-उत्तर विभागातील एव्हरशाईन नगर ते मालवणी पूल येथे रामचंद्र नाल्यावरील पूल.
पी-उत्तर विभागातील लगून रोड ते इन्फिनिटी मॉल जोडणारा पूल.
पी-उत्तर विभागातील धारीवली गावात मार्वे रोड येथील पूल.
(हेही वाचाः अर्थसंकल्प मांडणं हे आमच्यासाठी नवीन नाही, अजित दादा विरोधकांवर भडकले)