मुंबईतील ग्राहक न्यायालयाने उबेर इंडियाला मोठा दणका दिला आहे. उबेरच्या कॅबचालकाच्या चुकीमुळे एका महिलेची फ्लाईट चुकली ( मिस) झाली होती. त्यानंतर आता न्यायालयाने महिलेला नुकसान भरपाई म्हणून २० हजार रुपये देण्याचा आदेश दिला आहे.
( हेही वाचा : ATM मधून चक्क खेळण्यातील नोट निघाल्याने खळबळ)
काय आहे नेमके प्रकरण जाणून घ्या…
मुंबईतील हे प्रकरण चार वर्ष जुने आहे. डोंबिवलीमध्ये राहणाऱ्या अँड कविता शर्मा या १२ जून २०१८ रोजी सायंकाळी ५.५० वाजताच्या विमानाने चेन्नईला जाणार होत्या. विमानतळावर पोहोचण्यासाठी कविता यांनी उबेर कॅब बुक केली. हा प्रवास ३६ किमी अंतराचा होता. कॅब बुक केल्यानंतर १४ मिनिटांनी कॅब आली. बुकिंगवेळी दर्शवण्यात आलेल्या वेळेपेक्षा ही वेळ अधिक होती. कविता शर्मा सातत्याने कॅब चालकाला फोन करत होत्या परंतु संबंधित चालकाचा फोन व्यस्त लागत होता. चालक उशिरा आल्याने कविता यांना विमानतळावर पोहोचण्यास उशीर झाला आणि त्यांची फ्लाईट मिस झाली.
अधिक भाडे दर आकारले
या चालकाने कविता यांच्याकडून जास्तीचे भाडे वसूल केले होते. कॅब बुक करताना त्यांना ५६३ रुपये दाखवत होते त्यानंतर विमानतळावर पोहोचल्यावर हे भाडे ७०३ रुपये झाले. कविता यांनी तक्रार केल्यावर कंपनीने १३९ रुपये परत दिले होते मात्र कायदेशीर नोटीसला उत्तर दिले नव्हते. त्यानंतर कविता शर्मांनी ४ वर्ष कोर्टात लढा दिला.
ड्रायव्हरमुळे झाला उशीर
कॅब बुक केल्यावर ड्रायव्हर १४ मिनिटे उशिरा आला. यानंतर त्याने कार सीएनजी पंपावर नेली. तिथे गेल्यावर कारमध्ये गॅस भरण्यात आला. यासाठी परत उशीर झाला.
यानंतर आता कविता शर्मा यांना उबेरकडून भरपाई म्हणून २० हजार रुपये देण्याचा आदेश देण्यात आला आहे. न्यायालयाने उबेरला प्रवाशावर मानसिक तणाव निर्माण केल्याबद्दल १० हजार रुपये आणि खटल्याच्या खर्चासाठी १० हजार रुपये देण्यास सांगितले आहे.
Join Our WhatsApp Community