‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाचा पहिला लूक आणि पहिली चूक! सावरकरप्रेमींमध्ये नाराजी

203

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा 139वा जयंती सोहळा नुकताच संपन्न झाला. देशभरातील राष्ट्रनिष्ठावंतांनी या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकरांना विनम्र अभिवादन केले. पण याच दिवशी महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’या सिनेमाचा पहिला लूक समोर आला असून, त्यावर सावरकर प्रेमींनी पुन्हा एकदा आक्षेप नोंदवला आहे.

रणदीप हूडाच्या उंचीवरुन आक्षेप 

28 मे 2022 रोजी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीदिनी अभिनेता रणदीप हूडाने, या सिनेमातील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वेशातील आपला पहिला लूक सोशल मीडियावर शेअर केला. रणदीप हूडाचा हा लूक स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या व्यक्तिरेखेला अजिबात साजेसा नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांची उंची पाच फूट अडीच इंच इतकी होती, पण रणदीप हूडाची उंची ही त्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे सुरुवातीलाच सावरकरांची व्यक्तिरेखा साकारणा-या कलाकाराच्याच बाबतीत ही चूक समोर आली आहे, तर चित्रपटात अजून काय काय दाखवले जाईल?, पु.ल. देशपांडे यांच्या चित्रपटाबाबत जे घडले त्याचीच पुनरावृत्ती तर होणार नाही ना, अशी भीती सावरकरप्रेमी आणि अभ्यासकांकडून व्यक्त केली जात आहे.

सिनेमाच्या नावातही चूक

इतकेच नाही तर या चित्रपटाच्या नावावरही आक्षेप नोंदवला जात आहे. या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’या नावात स्वातंत्रवीर असा चुकीचा उल्लेख करण्यात आला आहे. ही चूक लक्षात आणून देऊन सुद्धा अजूनही त्यामध्ये कोणतीही सुधारणा करण्यात आली नसल्याने, सावरकरप्रेमींकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

veer

ग्लॅमरच्या नादात अतिरंजितपणा नको

ज्यावेळी या सिनेमाची घोषणा करण्यात आली त्यावेळीच सावरकर कुटुंबीयांशी चर्चा करुन सिनेमाची निर्मिती केली जावी, अशी सूचना देशभरातील सावरकरप्रेमींनी सिनेमाच्या टीमला केली होती. कारण मांजरेकर यांनी या आधी पु.ल. देशपांडे यांच्या जीवनावर केलेला चित्रपटही वादात सापडला होता. चित्रपटाला ग्लॅमरचा तडका देण्याच्या नादात त्यांनी पु.ल. देशपांडे यांच्याबाबत अनेक नकारात्मक आणि अतिरंजित गोष्टी दाखवल्या होत्या. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’चित्रपटातही असेच काहीतरी घडू शकते, अशी शंका यावेळी त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आली होती.

सावरकर कुटुंबीयांशी संपर्क नाही

सावरकरप्रेमींनी आक्षेप घेतल्यानंतर, या चित्रपटासंबंधी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे कुटुंबीय तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई यांच्याशी संपर्क साधला जाईल, असे आश्वासन सिनेमाचे दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी त्यावेळी दिले होते. पण अजूनपर्यंत सावरकर कुटुंबीयांशी त्यांच्याकडून किंवा सिनेमाच्या निर्मात्यांकडून कुठलाही संपर्क साधण्यात आला नसल्याचे सावरकर कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

सावरकरांची बदनामी होण्याची भीती

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबतीत पूर्वीपासूनच जाणीवपूर्वक अपप्रचार करण्यात येत आहे. ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण केले, त्या वीर सावरकर यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांची स्वातंत्र्यानंतर ७० वर्षे खोटेनाटे आरोप करत बदनामी करण्यात आली. स्वातंत्र्य चळवळीतील वीर सावरकर यांच्या कार्याचा जाणीवपूर्वक अनुल्लेख करण्याचे कारस्थान आजवरच्या काँग्रेसी सत्ताधीशांनी रचले. त्यामुळे या चित्रपटातही वीर सावरकर यांची बदनामी केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीती सावरकरप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.

इतिहासाच्या मूळ गाभ्याला धक्का लावू नका- चंद्रशेखर साने

सावरकर सिनेमाच्या निर्मात्यांनी इतिहासाच्या मूळ गाभ्याला धक्का लावू नये. सिनेमॅटिक लिबर्टी घेतानासुद्धा काही स्वयंशिस्त असायला हवी. सावरकरांसारख्या त्यांचा इतिहासिक काळ गाजवणाऱ्या व्यक्तीवरील सिनेमा वादग्रस्त न करतासुद्धा या सिनेमाला भरपूर यश मिळू शकेल ही गोष्ट निर्माता आणि दिग्दर्शकांनी नक्कीच लक्षात घेतली असेल, निदान तशी अपेक्षा आहे. सिनेमा चालावा म्हणून मुद्दाम स्वातंत्र्यवीर ऐवजी स्वतंत्रवीर लिहिणे अशा लक्षवेधी छोट्या-छोट्या चुका करून मार्केटिंग गिमिक्स वापरू नयेत. यामध्ये जो प्रमुख नट आहे त्याची शारीरिक उंची सावरकरांपेक्षा खूप जास्त आहे. हूडा यांचा चेहरा सावरकरांच्या चेहऱ्याशी सुद्धा मिळताजुळता नाही. सावरकरांची वैचारिक भूमिका त्यांच्यावर अन्याय न करता मांडणे आवश्यक आहे. निर्माते आणि दिग्दर्शकांनी योग्य ते सल्लागार निवडून पटकथा लिहायला आणि तपासून घ्यायला हवी. संवाद आणि प्रसंग यांचा प्रेक्षकांवर कशा पद्धतीने प्रभाव पडतो हे महत्त्वाचे असते. निर्माता-दिग्दर्शक लेखकाचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य जपतानाच सावरकरांच्या इतिहासाची सर्व बाजू योग्य पद्धतीने मांडली जावी त्यासाठी निर्माता-दिग्दर्शकांनी सावरकर अभ्यासकांशी चर्चा करणे आवश्यक आहे. सावरकर फार मोठ्या वैचारिक उंचीचे नेते आहेत. त्यामुळे सिनेमा सारखे प्रभावी दृकश्राव्य माध्यम वापरताना मांजरेकर यांनी काळजी घ्यावी अशी अपेक्षा आहे. या सिनेमातून सावरकरांचे विचार, त्यांचे समाजकार्य, राजकीय दृष्टी इतिहासाला धरून व्यक्त व्हावी समाजाला त्यातून काहीतरी सकारात्मक मिळावे या दृष्टीने निर्माता-दिग्दर्शक यांना अनेक चांगले अभ्यासक सहाय्य करू शकतात, असे स्पष्ट मत इतिहासकार आणि स्वातंत्र्यवीर सावरकर अभ्यासक चंद्रशेखर साने यांनी व्यक्त केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.