राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव अद्याप सुरूच असून आजही कोरोना बाधित रूग्ण आढळून येत आहेत. दरम्यान, कोरोनाने बळी गेलेल्या रूग्णाच्या कुटुंबीयांना ५० हजार रूपयाची आर्थिक मदत सरकारकडून देण्यात येणार आहे. ही मदत त्या-त्या कुटुंबापर्यंत पोहोचवण्यासाठी शासनाकडून कोरोनाने मृत पावलेल्या व्यक्तीच्या नावाची खातरजमा करण्यास सुरूवात झाली आहे. या शासनाच्या प्रक्रियेत एक धक्कादायक बाब समोर आली आहे. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरात तब्बल २१६ जिवंत माणसांचा समावेश कोरोनाने मृत्यू झालेल्यांचा यादीत करण्यात आला आहे. या धक्कादायक प्रकारानंतर एकच खळबळ उडाली आहे.
आरोग्य विभागाचा गलथान कारभार
शासनाच्या पोर्टलवर यापूर्वीच अनेक कोरोना मृतांची नाव नोंदवण्यात आली नसल्याचे उघड झाले होते. मात्र आता चक्क जिवंत व्यक्तीचे नाव नोंदवले गेल्याने आरोग्य विभागाचा गलथान कारभार समोर आला आहे. कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना सानुग्रह अनुदान म्हणून ५० हजार रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यासाठी प्रशासकीय पातळीवर कागदपत्रांची जमवाजमव करायचे काम शासन स्तरावर सुरू आहे. या प्रक्रियेदरम्यान हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
असा घडला प्रकार
मिळालेल्या माहितीनुसार, अंबाजोगाई तहसीलदारांकडे कोरोनामुळे मृत झालेल्या ५०० हून अधिक जणांची नावे या यादीत नोंदविण्यात आली आहे. या नावाची शहानिशा: करण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून या व्यक्तींच्या घरी चौकशी करण्यात आली. नागनाथ वारद यांच्याकडे कर्मचाऱ्याने जाऊन तुमच्या घरातील व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, त्यांची माहिती द्या असे सांगितले. विशेष म्हणजे नागनाथ वारद यांच्याकडेच या कर्मचाऱ्यानं त्यांच्याच मृत्यूची खातरजमा करण्यासाठी चौकशी केली, त्यावेळी हा धक्कादायक प्रकार समोर आला.
(हेही वाचा –ठरलं! विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर, कोण होणार नवा अध्यक्ष?)
मात्र या यादीत मृत व्यक्तींच्या संख्येपेक्षा जास्त नावं ही जास्त आहे, महसूल विभागाच्या हातात पडलेल्या यादीतून समोर आले आहे. अंबाजोगाईच्या आरोग्य विभागाकडे असलेल्या यादीमध्ये एकूण मृत व्यक्तींच्या नावाची नोंद ही ३१६ इतकी आहे. मात्र तहसीलदारांच्या हाती लागलेल्या यादीमध्ये मात्र एकूण ५३२ नावे आहेत. त्यामुळे ही वाढलेली २१६ नावे आली कुठून आणि असा प्रश्न मात्र आता समोर आला आहे.