मुख्यमंत्र्यांच्या वांद्र्यातच कोरोनाची ‘जत्रा’!

123

गेल्या दोन वर्षांत राज्य सरकारने कोरोनामुळे निर्बंध लावले आहेत. यामुळे जत्रा, यात्रा, सार्वजनिक कार्यक्रम यावर बंदी घालण्यात आली होती. आजही चित्रपट, नाट्यगृहे ५० टक्के क्षमतेने सुरू आहेत. कारण ओमायक्रॉन हा कोरोनाचा नवा व्हेरियंट धोक्याची सूचना देत अवतरला आहे. असे असूनही दुसरीकडे मात्र लोक मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाजवळचं मालवणी जत्रा भरवत आहे आणि सोशल डिस्टन्सिंगच्या (Social Distancing) नियमांचा फज्जा उडवत आहे. मालवणी पदार्थ, रुचकर जेवण, विविध साहसी खेळ यांचा मेळ म्हणजे मालवणी जत्रा. नोव्हेंबर-डिसेंबर सुरू झाला की, मुंबईत अनेक ठिकाणी मालवणी जत्रा भरवल्या जातात.

मालवणी जत्रा तिस-या लाटेसाठी कारणीभूत

मालवणी जत्रेचे वांद्रे पूर्व येथील मैदानात दरवर्षी आयोजन केले जाते, पण यंदाच्या वर्षी संपूर्ण राज्यावर ओमायक्रॉनचे सावट असताना मालवणी जत्रेत रविवारी विक्रमी गर्दी पहायला मिळाली. जत्रेच्या प्रवेशाद्वाराजवळ मोफत मास्कचे वाटप केले जात होते, मात्र दुर्दैव होते की, अनेक जण त्याकडे दुर्लक्ष करत जत्रेच्या गर्दीत स्वत:ला ढकलून देत होते आणि कुणीही कोरोना नियमांचे पालन करताना दिसून येत नव्हते. त्यामुळे मातोश्रीच्या अंगणातच कोरोनाच्या निर्बंधांचा फज्जा उडवला जात होता. असे असताना इतर ठिकाणी कडक कारवाई करणारी यंत्रणा इथे मात्र कुठे गायब होती, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या जत्रेत विविध झुले, आकाशपाळणे आहेत यातही सॅनिटायझर, मास्क शिवाय लोक प्रवेश करताना दिसत होते. मुंबई महानगरपालिकेने कोविड विषयक नियमावली जाहीर केलेली असतानाही या नियमांची दखल घेतली जात नाही. आता वांद्र्यापासून सुरू झालेली कोरोना जत्रा उद्या मुंबईच्या इतर ठिकाणी आयोजित केली, तर मात्र मालवणी जत्रा तिस-या लाटेसाठी कारणीभूत ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

( हेही वाचा : भाजप कार्यकर्त्यांविषयी ‘तो’ अपशब्द वापरणं राऊतांना पडलं भारी, दिल्लीत गुन्हा दाखल )

सुरक्षेचे काय?

मातोश्रीजवळच अनिल परब यांचेही निवासस्थान आहे. याठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून वाहतुकीसाठी रस्ता बंद करण्यात आला आहे. तर, दुसरीकडे हाकेच्या अंतरावर असलेल्या मालवणी जत्रेत मात्र कोरोनाच्या नियमांना पायदळी तुडवले जात असतानाही त्याकडे मात्र कानाडोळा केला जात आहे. त्यांच्या सुरक्षेचे काय, असा प्रश्न उपस्थित होतो. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर शाळांबाबतही निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे, अशा गंभीर परिस्थितीत जत्रेतील लोकांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण स्वीकारणार, कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाला असताना जत्रेची परवानगी कोणी दिली, असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.