देशासह राज्यात कोरोनाचा कहर सुरू असून कोरोनाचं सावट हळूहळू कमी होतांना दिसत असताना पुन्हा एकदा कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनने देखील देशात शिरकाव केला, या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी लहान मुलांच्या लसीकरणाची घोषणा केली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या घोषणेनंतर आजपासून मुंबईत 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका सज्ज असून आजपासून मुंबईत 9 लसीकरण केंद्रावर मुलांच्या लसीकरणाची सोय करण्यात आली आहे.
9 केंद्रांवर लहान मुलांच्या लसीकरणाची सोय
दरम्यान, मुंबई आरोग्य विभागाकडून असे सांगण्यात आले आहे की, 9 केंद्रांवर सुरुवातीच्या टप्प्यात लहान मुलांच्या लसीकरणाची सोय करण्यात आली आहे. लसीकरण केंद्रावर गर्दी होऊ नये यासाठी विशेष काळजी घेण्यात येणार आहे. तसेच लस घेतल्यानंतर संबंधित विद्यार्थ्याला अर्धा तास वैद्यकीय तज्ज्ञाच्या निगराणीत ठेवण्यात येणार असून, त्याला काही त्रास जाणवल्यास त्याच्या उपचारासाठी स्वतंत्र व्यवस्था देखील करण्यात आली आहे.
(हेही वाचा- मालमत्ता करात पूर्ण माफी की पुन्हा सूट: महापालिका प्रशासन गोंधळात)
पालिकेने केले असे आवाहन
मुंबईत 9 लसीकरण केंद्रांवर मुलांच्या लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली असून सुरूवातीला मुंबई महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना प्राधान्याने लस देण्यात येणार आहे. पालिकेच्या शाळेतील या विद्यार्थ्यांना टप्प्याटप्प्याने बसमधून लसीकरणासाठी केंद्रावर आणण्यात येणार आहे. लस दिल्यानंतर पुन्हा त्यांना शाळेत सोडण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. तसेच इतर खासगी शाळेतील विद्यार्थ्यांना देखील कोरोनाची लस देण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांनी ऑनलाईन नोंदणी करावी किंवा आपल्या जवळच्या लसीकरण केंद्रात जाऊन लस घ्यावी, असे आवाहन मुंबई महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.