मुंबईत दीड कोटींचा कोरोना लसीकरणाचा टप्पा पार

81

कोविड-१९ प्रतिबंधक राष्ट्रीय लसीकरण मोहीम अंतर्गत मुंबईत पहिली आणि दुसरी मात्रा मिळून एकूण दीड कोटी मात्रा देण्याची किमया बुधवारी करण्यात आली. मुंबईतील सर्व शासकीय, महापालिका आणि खासगी लसीकरण केंद्रांमध्ये दीड कोटी लोकांचे लसीकरण पार पडले. यामध्ये बुधवारी संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत ९२ लाख ०४ हजार ९५० (९९ टक्के) नागरिकांनी पहिली मात्रा घेतली आहे. तर ५८ लाख ६२ हजार ९३३ (६३ टक्के) नागरिकांनी दुसरी मात्रा घेतली आहे. अखेर साध्य करण्यात आली आहे.

विशेष कोरोना लसीकरण सुरु

मुंबईसह देशभरात दिनांक १६ जानेवारी २०२१ रोजी कोविड-१९ प्रतिबंधक राष्ट्रीय लसीकरण मोहीम सुरु झाली. टप्प्या-टप्प्याने या मोहिमेची व्याप्ती वाढविण्यात आली. सर्वप्रथम आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी लसीकरण सुरु झाले. त्यानंतर ५ फेब्रुवारी २०२१ रोजी आघाडीवरील अर्थात फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांसाठी, तर १ मार्चपासून ६० वर्ष वयावरील तसेच ४५ ते ५९ वयोगटातील सहव्याधी असलेल्या नागरिकांसाठी, आणि १ एप्रिलपासून ४५ वर्ष वयावरील सर्व नागरिकांसाठी व १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी १ मे २०२१ पासून लसीकरण सुरु करण्यात आले. मुंबई महानगरात वेगाने व अधिकाधिक नागरिकांचे कोविड लसीकरण करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभाग विविध उपक्रम राबवित आहे. त्याचाच एक भाग म्हणून विविध समाज घटकांसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करुन विशेष लसीकरण सुरु करण्यात आले.

(हेही वाचा- महाराष्ट्रात दत्तक घेणाऱ्या बालकांमध्ये सर्वाधिक ‘कन्या’!)

लसीकरण केंद्रांवर जास्त वेळ रांगेत उभे रहावे लागू नये म्हणून ४ मे २०२१ पासून ज्येष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह-इन लसीकरण सुरु करण्यात आले. स्तनदा मातांसाठी २६ मे २०२१ पासून तर विदेशात शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी अथवा नोकरी / व्यवसायासाठी जाणाऱ्यांकरता १ जून २०२१ पासून लसीकरण राबविण्यात येत आहे. शारीरिक व मानसिकरित्या दुर्बल व्यक्तिंसाठी २३ जून २०२१; गर्भवती स्त्रियांसाठी आणि शासकीय ओळखपत्र नसलेल्या नागरिकांसाठी १४ जुलै २०२१ पासून लसीकरण हाती घेण्यात आले. तर, वैद्यकीय कारणांनी व वयोमानाने अंथरुणास खिळून असलेल्या नागरिकांच्या घरी जाऊन २ ऑगस्ट २०२१ पासून लसीकरण राबविण्यात येत आहे.

यासोबतच, दिव्यांग व्यक्ती, आदिवासी बांधव, कारागृहांमधील बंदिवान, एलजीबीटी समुदायातील नागरिक इत्यादींसाठी विशेष केंद्र, फक्त महिलांसाठी राखीव विशेष लसीकरण सत्र, शिक्षक आणि १८ वर्ष वयावरील विद्यार्थी यांच्यासाठी राखीव सत्र, फक्त दुसरा डोस देय असणाऱ्या नागरिकांसाठी राखीव सत्र अशा निरनिराळ्या उपाययोजना महानगरपालिकेने केल्या आहेत. त्याचा परिणाम म्हणून सर्व समाज घटकांपर्यंत पोहोचून सर्वाधिक वेगाने लसीकरण करण्यात मुंबई आघाडीवर आहे. समाजातील कोणताही घटक लसीकरणातून वंचित राहणार नाही, याची पुरेपूर दक्षता प्रशासन घेत आहे.

लसीकरणाची व्याप्ती व वाढलेला वेग

  • १६ जानेवारी २०२१ : लसीकरणाला सुरुवात
  • ५ मे २०२१ : २५ लाख मात्रा
  • २६ जून २०२१ : ५० लाख मात्रा
  • ७ ऑगस्ट २०२१: ७५ लाख मात्रा
  • ४ सप्टेंबर २०२१ : १ कोटी मात्रा
  • १० नोव्हेंबर २०२१ : १ कोटी ५० लाख ६७ हजार ८८३ मात्रा
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.