गुरुवारी पावसाच्या अचानक झालेल्या शिडकाव्यांमुळे सरप्राइज मिळालेले असताना मुंबई प्रादेशिक हवामान खात्याचा कमाल तापमानाचा अंदाजही चुकला. गुरुवारी कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअसवर असल्याचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला होता. मात्र मुंबईतील सांताक्रूझ केंद्राचे कमाल तापमान ३८.९ अंश सेल्सिअसवर गेले. गुरुवारच्या कमाल तापमानाने मुंबईतील एप्रिल महिन्यातील आठ वर्षांतील कमाल तापमान मोडीत काढले. मात्र पवई आणि मुलुंड या मुंबईतील स्थानकांनी चक्क ४१.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाचा रेकॉर्ड केला. ही कमाल तापमानाची उच्चांकी नोंद गेल्या दहा वर्षांतील मार्च महिन्यातील सर्वात जास्त नोंद ठरली.
( हेही वाचा : ‘त्या’ १८ मंत्र्यांचा सरकारी रुग्णालयांवर भरवसा नव्हता का? )
सकाळी पावसाचा शिडकावा झाल्यानंतर सकाळच्या अंदाजपत्रात मुंबईत दिवसभर पावसाचा शिडकावा आणि काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस राहील, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने दिला. त्यावेळी कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअसवर राहील, असाही अंदाज वर्तवण्यात आला होता. मुंबईसाठी सांताक्रूझ केंद्रातील तापमान हे ग्राह्य धरले जाते. मात्र भर दुपारी सूर्य आग ओकू लागल्यानंतर दुपारी ४ वाजता सुधारित अंदाज देत कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअसच्या आसपास राहील, असा नवा सुधारित अंदाज वर्तवण्यात आला होता. सकाळच्या आणि दुपारच्या अंदाजपत्रात कमाल तापमानातील फरक पाहता सकाळच्या अंदाजपत्रात काय गडबड झाली, ही माहिती मुंबई प्रादेशिक हवामान खात्याकडून नाही मिळाली. सांताक्रूझ केंद्रातील आज नोंदवले गेलेले तापमान सरासरीच्या सहा अंशापेक्षा जास्त नोंदवले गेले. ही कल्पना तळपत्या सूर्याचा अनुभव आल्यानंतर मुंबई प्रादेशिक हवामान खात्याला आली की काय, अशी चर्चा होऊ लागली आहे. मुंबईतील शिडकावे आणि कमाल तापमानाची उकळी याबाबत खासगी अभ्यासकांनी बुधवारीच अंदाजपत्रक जाहीर केले होते. मुंबई प्रादेशिक हवामान खात्याच्या शिडकाव्याचा अंदाज आणि कमाल तापमानाचा अंदाज कुठे कमी पडला, हे मात्र कोणत्याही अधिका-याकडून स्पष्ट झालेले नाही.
मुंबईत इतरत्र नोंदवलेले कमाल तापमान ( अंश सेल्सिअसमध्ये)
- पवई, मुलुंड – ४१.७
- संजय गांधी ऱाष्ट्रीय उद्यान, बोरिवली – ४१.४
- घाटकोपर – ४१.१
- राम मंदीर आणि चेंबूर – ४०.५
- कुर्ला – ४०.३
- सायन – ३९.७
- माटुंगा – ३९.३
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – ३९.७
- सांताक्रूझ – ३८.९
- कुलाबा – ३७.२