सीडीएस जनरल बिपीन रावत व त्यांच्या सहकर्मचाऱ्यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत अपघाती मृत्यू झाला. तामिळनाडूच्या कुन्नूर येथील या दुर्घटनेप्रकरणी हवाई दलाने ट्राय सर्विस कोर्ट ऑफ इन्क्वॉयरीची स्थापना केली आहे. ही चौकशी समिती हेलिकॉप्टर दुर्घटनेच्या कारणांचाही शोध घेणार आहे. हवाई दलाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.
चौकशी जलद गतीने
हवाई दलाने आपल्या ट्विटर हँडलमध्ये नमूद केले की, ही चौकशी जलद गतीने करण्यात येणार आहे. तसेच अपघाताची कारणे आणि वस्तुस्थिती जाणून घेण्याचाही प्रयत्न असणार आहे. तसेच तपास पूर्ण होईपर्यंत मृतांचा पूर्ण सन्मान राखला जावा आणि कोणतीही चुकीची माहिती किंवा अनुमान करणे टाळावे, असे आवाहन हवाई दलाच्या वतीने करण्यात आले आहे. लष्कराच्या बड्या अधिकाऱ्यांना घेऊन हवाई दलाचे एमआय-17 व्ही 5 हेलिकॉप्टर बुधवारी कर्नाटक-तामिळनाडू सीमेवरील कुन्नूरकडे जात होते. यामध्ये सीडीएस बिपीन रावत, त्यांची पत्नी आणि त्यांच्या स्टाफसह भारतीय सैन्यदलातील बडे अधिकारी होते. जवळपास 14 जण या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. मात्र, दुपारी साडेबाराच्या सुमारास खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाले.
( हेही वाचा : धैर्यशील, द्रष्ट्या, कुशल रणनीतीकाराच्या निधनाने नि:शब्द झालो! – प्रविण दीक्षित )
IAF has constituted a tri-service Court of Inquiry to investigate the cause of the tragic helicopter accident on 08 Dec 21. The inquiry would be completed expeditiously & facts brought out. Till then, to respect the dignity of the deceased, uninformed speculation may be avoided.
— Indian Air Force (@IAF_MCC) December 10, 2021
सुरक्षित हेलिकॉप्टरचा अपघात
प्राथमिक माहितीनुसार, बिपीन रावत हे आपल्या पत्नीसह वेलिंगटन इथे एका कार्यक्रमासाठी जात होते. त्यावेळी त्यांच्यासोबत लष्कराचे वरिष्ठ अधिकारीही सोबत होते. वेलिंगटनमध्ये आर्मीचे कॉलेज आहे. या कॉलेजमध्ये सीडीएस बिपीन रावत यांचे व्याख्यान नियोजित होते. वेलिंगटनवरुन कुन्नूरला जाताना हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाले. दोन इंजिन असलेले एमआय-17 व्ही 5 हे हेलिकॉप्टर अतिशय सुरक्षित मानले जाते. पण तरीही हे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्याने, त्याबाबतच्या सुरक्षेबाबत पुन्हा नव्याने चर्चा सुरु झाली आहे. हे हेलिकॉप्टर रशियन बनावटीचं आहे. सैन्य दल आणि व्हीआयपींसाठी हे हेलिकॉप्टर मुख्यत्वे वापरले जाते.
Join Our WhatsApp Community