कोविड प्रतिबंधात्मक लस उत्पादनात अग्रेसर असलेल्या भारत बायोटेकने आता आपल्या कोवॅक्सिन लसीचे उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. गुजरात येथील चिरॉन बेहरिंग या सहाय्यक कंपनीसोबत आता भारत बायोटेक कोवॅक्सिनचे अतिरिक्त उत्पादन करणार आहे. यामुळे भारतातील कोवॅक्सिनचा होणारा तुटवडा भरुन काढण्यास मदत होणार आहे. याबाबतची माहिती भारत बायोटेकच्या सह-संस्थापक आणि संयुक्त व्यवस्थापकीय संचालक सुचित्रा इला यांनी ट्वीट करत दिली आहे. ही अतिशय सकारात्मक बाब असून आपल्याला हे सांगताना अतिशय आनंद होत आहे, असे सुचित्रा इला यांनी म्हटले आहे.
काय आहे ट्वीट?
भारत बायोटेक कडून वर्षाला 20 कोटी अतिरिक्त कोवॅक्सिन लसींच्या उत्पादनाचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. तसेच उच्च प्रतीचे उत्पादन घेण्यासाठी भारच बायोटेक कटीबद्ध आहे, असे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे. हैद्राबाद येथील भारत बायोटेकने हैद्राबाद आणि बंगळूर येथे कोवॅक्सिनचे उत्पादन सुरू केले आहे. आता गुजरातमधील अंकलेश्वर येथे असलेल्या चिरॉन बेहरिंग सोबत कंपनी उत्पादन सुरू करणार आहे. हे उत्पादन कोवॅक्सिनच्या उत्पादनासाठी आवश्यक असे बीएसएल रेटेड असणार आहे, असेही सुचित्रा इला यांनी ट्वीटद्वारे म्हटले आहे. चिरॉन बेहरिंग ही भारत बायोटेकची सहाय्यक संस्था म्हणून काम करत आहे. उत्पादन क्षमतेत भर पडल्यास कोवॅक्सिन डोसची मात्रा प्रति वर्ष 1 अब्ज डोसपर्यंत जाईल, असं देखील कंपनीने म्हटले आहे.
Glad to share a very positive development from us 20/5/21 🇮🇳 pic.twitter.com/cA3ZZx8pdc
— Suchitra Ella (@SuchitraElla) May 20, 2021
(हेही वाचाः ‘कोवॅक्सिन’ बाबत भारत बायोटेककडून मोठी माहिती… ‘या’ नव्या स्ट्रेन्सवरही लस प्रभावी)
नव्या स्ट्रेनवरही कोवॅक्सिन प्रभावी
हैद्राबाद येथील भारत बायोटेक कंपनीच्या मार्फत कोरोनावर प्रतिबंधात्मक असलेल्या कोवॅक्सिन लसीचे उत्पादन करण्यात येत आहे. ही लस भारतात नव्याने आढळून आलेल्या B.1.617 आणि ब्रिटनमध्ये आढळलेल्या B.1.1.7 या नव्या स्ट्रेनवर सुद्धा अत्यंत प्रभावी असल्याचे एका संशोधनात समोर आले आहे. याबाबतची माहिती भारत बायोटेकच्या सह-संस्थापक आणि संयुक्त व्यवस्थापकीय संचालक सुचित्रा इला यांनी ट्वीट करत दिली आहे. B.1.617 या नव्या स्ट्रेनची घातक परिणामकारकता कमी करण्यात कोवॅक्सिन लस प्रभावी असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community