गावातही चालला कोरोना… विदर्भात रुग्णसंख्या का वाढतेय? अमरावती जिल्ह्याचा आढावा

विदर्भातील अमरावती जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दररोज वाढत असल्याचे आढळून येत आहे. पूर्वी केवळ शहरात पसरणारा कोरोना आता गावा-गावांत पोहोचू लागल्याने, ही संख्या वाढत असल्याची माहिती मिळत आहे.

संपूर्ण भारतात पुन्हा एकदा कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही वाढत आहे. ही कोरोनाची दुसरी लाट असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण कोरोनाच्या पहिल्या लाटेनुसारच या दुस-या लाटेच्या वेळी सुद्धा महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण सापडत आहेत. यावेळी मुंबई शहरासोबतच विदर्भातील कोरोना रुग्णसंख्या ही झपाट्याने वाढत आहे. विदर्भातील अमरावती जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दररोज वाढत असल्याचे आढळून येत आहे. पूर्वी केवळ शहरात पसरणारा कोरोना आता गावा-गावांत पोहोचू लागल्याने, ही संख्या वाढत असल्याची माहिती मिळत आहे.

शहरात नाही, तर गावात वाढतो कोरोना

विदर्भातील प्रमुख जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या ही दिवसेंदिवस वाढण्याचे मुख्य कारण, ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत असल्याचे सांगण्यात येत आहे. अमरावती प्रशासकीय विभागातील यवतमाळ आणि अमरावती या दोन जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्येची वाढ होण्यास फेब्रुवारी-२०२१ पासून पुन्हा एकदा सुरुवात झाली. आठ दिवस अमरावती जिल्ह्यात ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांची संख्या ही शहरी भागातील रुग्णसंख्येपेक्षा जास्त असल्याचे दिसून येत आहे, असे जिल्हा आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे. अमरावती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवल यांच्या म्हणण्यानुसार, पहिल्या कोरोना लाटेच्या वेळी सर्वाधिक रुग्ण हे जिल्ह्यातील झोपड्या आणि गर्दीच्या ठिकाणी आढळून येत होते. पण आता कोरोनाचा प्रादुर्भाव हा ग्रामीण भागातही पोहोचला आहे. त्यामुळे हा मोठा चिंतेचा विषय ठरत आहे. दुस-या लाटेदरम्यान शहरी आणि ग्रामीण भागात ५० टक्क्यांपर्यंत बाधित रुग्ण आढळून आले आहेत.

(हेही वाचाः वाढत्या रुग्णसंख्येमुळे ऑक्सिजन पुरवठ्यासाठी नवीन निर्देश! कसा असेल पुरवठा?)

नागरिकांकडून नियमांचा भंग

१७ मार्च रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत केंद्र सरकारने ग्रामीण भागात प्रादुर्भाव वाढत असल्याचे सांगितले होते. फेब्रुवारीमध्ये केंद्र सरकारच्या पथकाने महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्याला भेट दिली होती. त्यावेळी पथकाने जिल्ह्यातील ग्रामीण भागात सर्वाधिक रुग्ण आढळून येत असल्याची भीती व्यक्त केली होती. २७ मार्चपर्यंत ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. या परिस्थितीला लोकांचा निष्काळजीपणा जबाबदार असल्याचे स्थानिक प्रशासनाकडून म्हटले जात आहे. शासनाच्या नियमांचे नागरिक पालन करत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. विनामास्क वावरणे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे, लग्न आणि इतर समारंभांमध्ये गर्दी करणे या सर्व गोष्टींमुळे ही संख्या वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.

१ फेब्रुवारीपासून सर्वाधिक रुग्ण

होळीच्या दोन दिवस आधी अमरावतीतील अचलपूर तालुक्यातील सदर बाजार येथे मोठ्या प्रमाणावर होळीच्या खरेदीसाठी गर्दी झाली होती. यावेळी अनेक नागरिक आणि विक्रेते हे विनामास्क असल्याचे आढळून आले होते. स्थानिक नगरपालिका क्षेत्राने दिलेल्या माहितीनुसार, विभागातील १३१ गावांमध्ये २६ मार्चपर्यंत १ हजार १५८ नवे रुग्ण आढळून आले आहेत. याच गावांमध्ये गेल्या वर्षी रुग्णसंख्या ही अत्यंत कमी होती. पण १ फेब्रुवारी २०२१ पासून ही संख्या सातत्याने वाढत आहे, असे आरोग्य विभातील कर्मचा-यांचे म्हणणे आहे. जिल्ह्यातील धारणी तालुक्यात सुद्धा कोरोनाबाधितांची संख्या ही चिंतेचा विषय असल्याचे म्हटले जात आहे.

(हेही वाचाः लॉकडाऊनवरुन सत्ताधा-यांमध्येच विरोधाचा सूर!)

चाचण्यांची संख्या वाढली

वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून जिल्ह्यातील चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यात आले आहे. वाढत्या चाचण्यांमुळेच ग्रामीण भागातील नव्या रुग्णांची संख्या वाढली असल्याचे सांगण्यात येत आहे. स्थानिक नागरिकांकडून मात्र या परिस्थितीला प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. ग्रामीण भागातील रुग्णांची वाढती संख्या वेळीच रोखण्यासाठी स्थानिक प्रशासन प्रयत्न करत आहेच पण, त्यासोबतच नागरिकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक असून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here