‘माका काय होताला?’ म्हटलास आणि झालो घात!

सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता कोरोना रुग्ण आणि मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. गेल्या वर्षी राज्यात इतके कोरोना रुग्ण वाढत असताना, या जिल्ह्यात मात्र कोरोना नियंत्रणात होता. पण...

काय रे मास्क कित्याक लायनाय ना… असा प्रश्न जर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणाला विचारला, तर माका काय होताला, असे उत्तर सर्रास ऐकू यायचे. मात्र आता जिल्ह्यातील लोकांचा हाच हलगर्जीपणा त्यांच्या चांगलाच अंगाशी आला आहे. त्याचे कारण म्हणजे सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता कोरोना रुग्ण आणि मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. गेल्या वर्षी राज्यात इतके कोरोना रुग्ण वाढत असताना, या जिल्ह्यात मात्र कोरोना नियंत्रणात होता. हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच या जिल्ह्यात कोरोना रुग्ण होते. मात्र आता या जिल्ह्याची परिस्थिती बदलली असून, या जिल्ह्यातील गावागावांमध्ये कोरोनाने शिरकाव केला आहे.

अनेक गावे कोरोनाच्या विळख्यात

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ला, देवगड, मालवण या भागातील गावागावांमध्ये सध्या कोरोना रुग्ण वाढत आहे. मृत्यूचा आकडा देखील वाढत असून, जिल्ह्यामध्ये सध्या ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड्सचा देखील तुटवडा जाणवत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या ५ हजार २२४ अॅक्टिव्ह रुग्ण असून, आतापर्यंत ४३९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच जिल्ह्यात १८ हजार २७१ बाधित रुग्ण होते, त्यातील १२ हजार ६०५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही परिस्थिती भयानक मानली जात असून, सध्या या जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आले आहे.

(हेही वाचाः राज्यात 1 जूनपर्यंत लॉकडाऊन कायम… असे आहेत नियम!)

तरीही लोक सुधरेनात

जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत असताना गावागावांमध्ये आजही विनामास्क फिरताना अनेक जण पहायला मिळत आहेत. फक्त शहरात जाताना हे लोक मास्कचा वापर करतात. अन्यथा गावागावात मात्र मास्क लावणाऱ्यांची बोंबच आहे. अनेक ठिकाणी आजही चौकाचौकात गप्पांंचे फड देखील रंगलेले पहायला मिळत आहेत. एवढेच नाही तर काही गावांमध्ये लपूनछपून आलेले मुंबईकर देखील बिनधास्त वावरत आहेत.

लसीकरणातही लोकांची उदासिनता

जिल्ह्यातील ग्रामीण भागात देखील अजूनही लसीकरणाची उदासिनता पहायला मिळत आहे. एकतर गावापासून लांब लसीकरण केंद्रे असल्याने जाण्या-येण्याचा खर्च लोकांना परवडत नाही. त्यामुळे लस घेण्यासाठीच जाणेच गावातील लोक टाळत आहेत. तर दुसरे कारण म्हणजे आजही गावामध्ये लसीबाबत संभ्रम असल्याने लस नको रे बाबा, असाच सूर लोकांकडून ऐकू येत आहे.

(हेही वाचाः म्युकरमायकोसीसच्या विरोधात लढण्यासाठी भारत सरकारने उचलले ‘हे’ पाऊल)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here