मंत्रालय… चांद्यापासून बांद्यापर्यंतचा गाडा जिथून हाकला जातो असे हे ठिकाण. मात्र सध्या हे मंत्रालय कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. राज्यात सध्या कोरोनाने थैमान घातलेले असताना मंत्रालय देखील या कोरोनाच्या तावडीतून सुटले नाही. मंत्रालयामध्ये दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत. आतापर्यंत मंत्रालयातील कर्मचारी आणि अधिकारी यांना झालेल्या कोरोनाची आकडेवारी पाहिली, तर मंत्रालयात कोरोना रुग्णांनी सेंन्च्युरी पार केल्याचेच चित्र आहे. यामध्ये अधिकारी ते कर्मचारी यांचा देखील समावेश आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे मंत्रालयातील असा एकही विभाग नाही ज्या विभागात कोरोनाचे रुग्ण सापडत नाहीत. त्यामुळे आता मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी पुरते धास्तावले आहेत.
या विभागांत कोरोनाचा शिरकाव
मंत्रालयातील महसूल विभाग, जलसंपदा विभाग यासह अनेक विभागांमध्ये कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. यामध्ये महसूल विभागात आतापर्यंत सर्वाधिक 17 रुग्णांची नोंद झाली आहे. तर इतरही विभागांत रुग्णसंख्या वाढत आहे.
जलसंपदा विभाग- 14 रुग्ण
शालेय शिक्षण- 7 रुग्ण
मृद् जलसंधारण- 7 रुग्ण
आदिवासी विकास- 6 रुग्ण
सार्वाजनिक बांधकाम- 8 रुग्ण
गृह विभाग- 4 रुग्ण
नियोजन विभाग- 6 रुग्ण
पर्यटन विभाग- 6 रुग्ण
अल्पसंख्यांक विभाग- 3 रुग्ण
वन विभाग- 3 रुग्ण
तर मंत्रालयाच्या शेजारी असलेल्या एमपीएससी कार्यालयात तब्बल 30 कोरोना रुग्ण आढळले आहेत.
(हेही वाचाः कडक निर्बंधांमध्ये प्रवासी गाड्या चालू राहणार का? रेल्वे मंत्रालयाने दिले उत्तर!)
वर्षभरात २० जणांचा कोरोनाने मृत्यू
मागील वर्षभराचा विचार केला तर मंत्रालयात काम करणाऱ्या एकूण २० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर मागील आठवडयांत एकूण पाच जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मंत्रालय अधिकारी संघटनेचे सरचिटणीस विष्णू पाटील यांनी दिली. तसेच आज मंत्रालयात टेस्ट केली, तर ५ ते १० टक्के लोक कोरोना पॉझिटिव्ह सापडतील, असे देखील ते म्हणाले. तसेच काही जण कोरोनाचे उपचार परस्पर घेतात ते त्यांची कल्पना संबंधित कर्मचाऱ्यांना देत नाहीत. त्यांनी त्यांची माहिती विभागातील इतर कर्मचाऱ्यांना देखील द्यावी, असे विष्णू पाटील म्हणाले.
कर्मचाऱ्यांच्या काय आहेत मागण्या
ज्यांचा कोरोनामुळे मृत्यू होतो त्यांना ५० लाखांचे कवच दिले पाहिजे, अशी मागणी संघटनेने याआधीच करायला हवी. तसेच कोरोना काळात ज्या कर्मचाऱ्याला कोरोना होतो किंवा त्याच्या कुटुंबात कोरोना होतो, अशावेळी विशेष बाब म्हणून रजा मंजूर करायला हवी, अशी संघटनेने मागणी केलेली आहे. एवढेच नाही तर राज्याचे नाक असलेल्या मंत्रालयामध्ये टॉयलेट आजही अस्वच्छ असतात त्यावर देखील लक्ष द्यावे, असे संघटनेचे म्हणणे आहे.
(हेही वाचाः हे आहेत सुशिक्षित ‘बेजबाबदार’!)
Join Our WhatsApp Community
मंत्रालयात सध्या ५० टक्के उपस्थिती करण्यात आली असून, वाढती कोरोना रुग्णसंख्या बघता सरकारने ही उपस्थिती २५ टक्के करावी. तसेच आज मंत्रालयामध्ये जर नजर मारली, तर अनेक ठिकाणी सॅनिटायजरचे जे डब्बे आहेत ते देखील रिकामे असल्याचे चित्र आहे.
-विष्णू पाटील, सरचिटणीस मंत्रालय कर्मचारी संघटना