१० हजार कैद्यांना जामीन, पॅरोलवर सोडूनही तुरुंगातील कोरोना कमी होईना!

कोरोना काळात कच्चे कैदी आणि शिक्षा झालेल्या कैद्यांना जामिनावर तसेच पॅरोलवर सोडण्यासाठी उच्च न्यायालयात सुओमोटो याचिका दाखल करण्यात आली आहे.

कोरोना काळात १० हजार ७८८ कैद्यांना जामीन तसेच पॅरोलवर सोडण्यात येऊन देखील, राज्यातील तुरुंगांतील कोरोना परिस्थिती आहे तशीच आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कैद्यांना जामीन आणि पॅरोलवर सोडण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. या निर्णयावर गुरुवारी उच्च न्यायालयात सुनावणी होणार असल्याची माहिती तुरुंग अधिकारी दराडे यांनी दिली.

उच्च न्यायालयात याचिका दाखल

राज्यभरातील तुरुंगात सध्या ३४ हजार ९४३ कैदी आहेत. गेल्यावर्षी एवढीच संख्या होती. १० हजार ७८८ कैद्यांना जामीन आणि पॅरोलवर सोडून देखील मे २०२० नंतर वर्षभरात तेवढ्याच संख्येने कैदी राज्यभरातील तुरुंगात वाढले आहेत. सर्वात अधिक कैदी मुंबईतील आर्थर रोड, ठाणे मध्यवर्ती, कल्याण आधारवाडी, आणि तळोजा या तुरुंगांत वाढले आहेत. तळोजा तुरुंग सोडल्यास या बाकी तुरुंगात कोरोनाचा संसर्ग देखील पसरला आहे. कोरोना काळात कच्चे कैदी आणि शिक्षा झालेल्या कैद्यांना जामिनावर तसेच पॅरोलवर सोडण्यासाठी उच्च न्यायालयात सुओमोटो याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर गुरुवारी सुनावणी होणार असून, कारागृह प्रशासनाकडे गंभीर गुन्ह्यांतील कैदी आणि लहान गुन्ह्यांतील कैदी (ज्यांना जामीन देता येतील असे) यांची यादी मागवण्यात आलेली असल्याची माहिती, तुरुंग प्रशासन अधिकारी दराडे यांनी दिली आहे.

(हेही वाचाः भायखळा तुरुंगातील ३९ महिला कैदी कोरोनाबाधित… ‘या’ प्रकरणातील आरोपीलाही झाला कोरोना!)

कधी व किती कैदी सोडले

मार्च २०२०मध्ये कोरोनाचे संक्रमण वाढत असताना, मार्च महिन्यात राज्यभरातील तुरुंगातून ५१०५ कैद्यांना जामिनावर सोडण्यात आले होते. तर शासनाच्या आदेशानुसार, ८ मे २०२० रोजी २६६४ कैद्यांना संचित रजा(पॅरोल लिव्ह) देण्यात आली. तसेच ११ मे २०२० रोजी ३ हजार १९ जणांना जामिनावर सोडण्यात आले. त्यानंतर राज्यातील तुरुंगातील कैद्यांची संख्या आटोक्यात आली होती. मात्र पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी होताच, वर्षभरात ही आकडेवारी पुन्हा गेल्यावर्षी होती तेवढीच झाली असल्याचे दराडे यांनी सांगितले.

कोरोना चाचणी शिवाय तुरुंगात प्रवेशबंदी

विविध गुन्ह्यांत पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींना न्यायालयीन कोठडी मिळाल्यास त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात येते. मात्र गेल्या वर्षापासून आरोपींची आरटीपीसीआर(कोरोना चाचणी) करुन त्याचा अहवाल आल्यानंतर न्यायालयीन बंदी असलेल्या कैद्यांना, तुरुंगात प्रवेश दिला जातो. जर तो कैदी पॉझिटिव्ह असल्यास त्याला विलगीकरण कक्षात ठेवून, त्याच्यावर औषधोपचार केले जातात. त्यानंतर त्याची पुन्हा चाचणी करुन अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर, त्याची रवानगी इतर कैद्यांसोबत केली जात असल्याची माहिती, दराडे यांनी दिली आहे.

(हेही वाचाः कोरोना जेलमध्येही शिरला… १५ जणांचा मृत्यू!)

तुरुंगाबाहेर विलगीकरण कक्ष

न्यायालयीन बंदींसाठी तुरुंगाबाहेरच विलगीकरण कक्ष उभारण्यात येणार असून, त्यासाठी तुरुंगाजवळ असलेल्या महापालिका शाळा, तसेच सभागृह घेऊन त्याचे विलगीकरण कक्षात रुपांतर करण्यात येणार आहे. त्याठिकाणी बाहेरुन येणा-या कैद्यांची कोरोना चाचणी करुन, अहवाल येईपर्यंत त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात येईल. गेल्यावर्षी या धर्तीवर कैद्यांना ठेवण्यासाठी तुरुंगाबाहेर विलगीकरण कक्ष उभारण्यात आले होते, असेही दराडे यांनी सांगितले.

बाधित कैद्याची योग्य काळजी 

राज्यातील ४७ तुरुंगात २४६ कैद्यांना कोरोनाची लागण झाली असून, ९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच तुरुंगातील अधिका-यांसह १०२ जणांना कोरोनाची बाधा झाली असून ८ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधित कैद्यांना वेळीच उपचार मिळावा यासाठी प्रत्येक तुरुंगात कोविड सेंटर उभारण्यात आले असून, बाधित कैद्यांना त्या ठिकाणी ठेवण्यात आले आहे. डॉक्टरांच्या देखरेखीत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अद्याप एकाही बाधित कैद्याला तुरुंगाबाहेर रुग्णालयात दाखल करण्यात आले नसल्याची माहिती तुरुंग अधिका-यांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here