कोरोना जेलमध्येही शिरला… १५ जणांचा मृत्यू!

राज्यातील कारागृहात कोरोनाने थैमान घातले असून, आतापर्यंत विविध कारागृहात ३ हजार ११६ कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी २ हजार ९११ कैदी बरे झाले असून, २८४ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. वर्षभरात विविध कारागृहात १५ जणांचा मृत्यू झालेला असून, यात कारागृहातील अधिकारी कर्मचारी यांचा देखील समावेश आहे. कारागृहात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कैदी आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

कारागृहात कोरोनाचे थैमान

राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत पण त्याचबरोबर मृत्यूचा आकडाही वाढत आहे. राज्यभरात कोरोना रुग्णांना बेडसाठी तसेच, रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नसल्यामुळे, गोंधळाचे वातावरण पसरले आहे. कोरोनाने राज्यासह कारागृहात देखील शिरकाव करुन थैमान घातले असल्याचे दिसून येत आहे. राज्यभरात लहान-मोठे असे ४७ कारागृह असून, या कारागृहात सध्याच्या स्थितीला कच्च्या कैद्यांसह शिक्षा झालेले एकूण ३४ हजार ४२२ कैदी आहेत. गेल्यावर्षी ही संख्या ४५ हजारच्या घरात होती. गेल्या वर्षी कोरोनाच्या भीतीने शासनाच्या आदेशावरुन १० हजार कैद्यांना पॅरोल आणि जामिनावर सोडवण्यात आले होते.

(हेही वाचाः संचारबंदीमुळे डबेवाल्यांची ‘उपासमार’!)

अशी आहे तुरुंगातील कोरोनाची स्थिती

मार्च २०२० ते १४ एप्रिल २०२१ पर्यंत ५७ हजार ३२४ कैदी आणि ३ हजार ८९६ कारागृहातील कर्मचारी आणि अधिकारी यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी ३ हजार ११६ कैद्यांना तर, ७१७ अधिकारी आणि कर्मचारी यांचे पॉझिटिव्ह अहवाल आले होते. २ हजार ९११ कैदी ६२३ अधिकारी आणि कर्मचारी यातून बरे झाले आहेत. सध्याच्या घडीला १९८ कैदी, ८६ कारागृह कर्मचारी आणि अधिकारी असे एकूण २८४ जण अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये आतापर्यंत ७ कैदी आणि ८ कारागृह अधिकारी कर्मचारी अशा एकूण १५ जणांचा मृत्यू झाला आहे.

३४ हजारपैकी केवळ १ हजार ३२६ जणांना लस

राज्यभरात असलेल्या ४७ कारागृहांत लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. संपूर्ण राज्यभरातील कारागृहात ३४ हजार ४२२ कैदी असून, त्यापैकी केवळ १ हजार ३२६ कैद्यांना लस देण्यात आली आहे. काही कारागृहांत तर एकाही कैद्याला लस देण्यात आलेली नसल्याचे कारागृह प्रशासन यांनी जारी केलेल्या आकडेवारीत पुढे आले आहे. मुंबईतील आर्थर रोड कारागृहात सर्वाधिक म्हणजे २ हजार ८७३ कैदी असून त्यापैकी १३० जणांनाच लस देण्यात आली आहे. ठाण्यात ३ हजार ७५८ कैदी असून, त्यापैकी २२० जणांचे लसीकरण झाले आहे. तळोजा कारागृहात ३ हजार ३४९ कैदी, कल्याणच्या आधारवाडी कारागृहात १ हजार ९७० कैदी आहेत. त्या ठिकाणी देखील लसीकरण करण्यात आलेले नाही. अलिबाग, रत्नागिरी, सोलापूर, अहमदनगर,बीड, नांदेड, जालना येथील कारागृहांत अद्याप लसीकरण झालेले नाही.

(हेही वाचाः वसई-विरार पालिकेने लपवले २४३ कोरोना मृत्यू!)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here