खासगी रुग्णालयातील कोविड लसीकरण केंद्रे २४ तास सुरु राहणार!

लसीकरण केंद्रे २४ तास कार्यरत झाल्यास दिवसाला १ लाख व्यक्तींचे लसीकरण करणे सहज शक्य होईल, असा विश्वास महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी व्यक्त केला.

मुंबईमधील खासगी रुग्णालयांना आठवड्याचे सातही दिवस व दिवसाचे २४ तास (२४ x ७) लसीकरण सुरु ठेवण्याच्या मुंबई महानगरपालिकेच्या प्रस्तावास केंद्र शासनाने नुकतीच मंजुरी दिली आहे. केंद्र शासनाने दिलेल्या मंजुरीनुसार मुंबईतील रुग्णालयांनी आठवड्याचे सातही दिवस २४ तास लसीकरण केंद्रे सुरु करावीत, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी केले आहे. २४ तास कार्यरत राहणारी लसीकरण केंद्रे सुरु झाल्यानंतर दररोज १ लाख व्यक्तींचे लसीकरण करण्याचे लक्ष्य असल्याचा मानस महापालिका आयुक्तांनी व्यक्त केला आहे.

लसीकरण वाढविण्यासाठी विशेष आढावा बैठकीचे आयोजन

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार मुंबई महापालिका क्षेत्रात ‘कोविड – १९’ लसीकरण विषयक समन्वयात्मक कार्यवाही व अंमलबजावणी मुंबई महानगरपालिकेच्या स्तरावर सुयोग्यप्रकारे करण्यात येत आहे. या अनुषंगाने तसेच लसीकरण वाढविण्याबाबत महानगरपालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्या प्रमुख मार्गदर्शनात आज एका विशेष आढावा व नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित या बैठकीला अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांनी देखील मार्गदर्शन केले. तर महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याचे ज्येष्ठ अधिकारी, मनपा रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर मंडळी, महापालिका क्षेत्रातील विविध खासगी रुग्णालयांचे प्रतिनिधी, अति मान्यवर या बैठकीला उपस्थित होते.

आणखी २९ रुग्णालयात लसीकरण केंद्र

या बैठकी दरम्यान सध्याच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर कोविड लसीकरण संख्या सुनियोजित पद्धतीने वाढविणे, याबाबत आवश्यक ते सर्व व्यवस्थापन सुयोग्यप्रकारे करणे आणि कोविड लसीकरणाशी संबंधित विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सध्या सुरु असणारी लसीकरण केंद्रे ही ८ तास ते १२ तास या कालावधीसाठी कार्यरत आहेत. या लसीकरण केंद्रांद्वारे ९ मार्च, २०२१ रोजी ३८ हजार २६६ व्यक्तिंचे लसीकरण करण्यात आले. ही लसीकरण केंद्रे २४ तास कार्यरत झाल्यास दिवसाला १ लाख व्यक्तींचे लसीकरण करणे सहज शक्य होईल, असा विश्वास महापालिका आयुक्तांनी आजच्या बैठकीदरम्यान व्यक्त केला. त्याचबरोबर आणखी २९ रुग्णालयांमध्ये लसीकरण केंद्रे सुरु करण्याचा प्रस्ताव महानगरपालिकेद्वारे यापूर्वीच शासनाकडे पाठविण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.

महिन्याभरात ज्येष्ठांचा धोका टळणार!

२४ तास कार्यरत राहणारी लसीकरण केंद्रे सुरु झाल्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील लसीकरण संख्या सुनियोजित पद्धतीने वाढविण्यास मदत होईल. ही बाब लक्षात घेता, अशा प्रकारची लसीकरण केंद्रे सुरु झाल्यानंतर दररोज १ लाख व्यक्तींचे लसीकरण करण्याचे लक्ष्य असल्याचा मानस महापालिका आयुक्तांनी आजच्या बैठकी दरम्यान नमूद केला. तसेच मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिकांची संख्या ही सुमारे ३० लाख आहे, ही बाब लक्षात घेतल्यास व दिवसाला १ लाख व्यक्तींचे लसीकरण झाल्यास साधारणपणे महिन्याभरात मुंबईतील बहुतांश ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण झालेले असेल. कोविडचा धोका ज्येष्ठ नागरिकांना अधिक असतो, त्यामुळे अधिकाधिक ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण लवकरात लवकर करणे गरजेचे आहे. यासाठी मुबई महानगरपालिका सातत्याने सर्वस्तरीय प्रयत्न करत असल्याचेही महापालिका आयुक्तांनी नमूद केले.

(हेही वाचा : सुधीर भाऊंसाठी देशमुख गायले गझल!!!)

आतापर्यंत १५ हजार ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण

वय वर्षे ६० पूर्ण केलेल्या सर्व व्यक्तींचे लसीकरण सध्या करण्यात येत आहे. या अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ९ मार्च, २०२१ पर्यंत १ लाख ३६ हजार ४९१ व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले आहे. तसेच वय वर्षे ४५ ते ५९ या वयोगटातील सहव्याधी असलेल्या व्यक्तींचेही लसीकरण करण्यात येत असून, या गटातील १५ हजार २७२ व्यक्तींचे लसीकरण ९ मार्च, २०२१ पर्यंत करण्यात आले आहे.

४४ वर्षांच्या सहव्याधी व्यक्तीचे लसीकरण

दोन्ही वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण करण्यासाठी १ जानेवारी, २०२२ रोजीचे वय लक्षात घ्यावयाचे आहे. यानुसार आज ज्यांचे वय ५९ वर्षे ३ महिने किंवा सहव्याधी असणा-या गटातील व्यक्तींचे वय ४४ वर्षे ३ महिने असले, तरी देखील त्यांची लसीकरणासाठी नोंदणी करणे व नंतर लसीकरण करणे शक्य आहे, ही बाब महानगरपालिका आयुक्त महोदयांनी आजच्या बैठकी दरम्यान आवर्जून नमूद केली.

आयटी आणि आरोग्य विभागाचा चमू गठीत

मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील व्यक्तींचे लसीकरण करण्यापूर्वी त्यांची नोंदणी ही संबंधित भ्रमणध्वनी ऍपवर, अर्थात कोविन ऍपवर होणे गरजेचे आहे. तसेच यासाठी रुग्णालयांमध्ये जाऊन थेट नोंदणीचा पर्याय देखील नागरिकांसाठी उपलब्ध आहे. *रुग्णालयांच्या स्तरावर संबंधित संकेतस्थळाद्वारे नोंदणी करण्यात अडचणी असल्याची बाब काही खासगी रुग्णालयांद्वारे आजच्या बैठकी दरम्यान मांडण्यात आली. याबाबत महापालिका आयुक्तांनी सार्वजनिक आरोग्य खात्यातील अधिकारी व माहिती तंत्रज्ञान खात्यातील अधिकारी यांचा समावेश असलेली चमू तात्काळ गठीत करण्याचे व सदर चमू दिनांक ११ मार्च, २०२१ पासून महापालिकेच्या ‘१९१६’ या दूरध्वनी क्रमांकाशी संलग्न करण्याचे आदेश दिले. जेणेकरुन रुग्णालयांच्या स्तरावर थेट नोंदणी करताना काही तांत्रिक अडचण आल्यास सदर दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून अडचणीचे निवारण करता येईल.

तर रुग्णालयातील मान्यता रद्द

मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ज्या रुग्णालयांना लसीकरण केंद्रे सुरु करण्यास यापूर्वीच केंद्र शासनाद्वारे मान्यता प्रदान करण्यात आली आहे. परंतु, ज्यांनी अद्यापही लसीकरण केंद्र सुरु केले नाही, अशा रुग्णालयातील लसीकरण केंद्राची मान्यता रद्द करण्यात येईल, अशी माहितीही आजच्या बैठकी दरम्यान देण्यात आली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here