‘एनआयए’ चा अधिकारी असल्याचे सांगत कुख्यात गँगस्टरकडूच उकळले ५० लाख; भामट्याला अटक

खंडण्या उकळणाऱ्या गँगस्टरलाच ५० लाखांचा चुना लावल्याचा प्रकार समोर आला आहे. एनआयएचा अधिकारी असल्याचे सांगत गँगस्टर सलीम फ्रुट याच्याकडून ५० लाख रुपये उकळणाऱ्या विजय काळे याला अटक करण्यात आली आहे. एनआयएने विजय काळे याला ताब्यात घेऊन गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाच्या ताब्यात दिले आहे असून, खंडणीविरोधी पथकाने काळे याला अटक केली आहे.
सलीम फ्रुट हा गँगस्टर सध्या केंद्रीय तपास यंत्रणा एनआयए च्या अटकेत आहे. गेल्या आठवड्यात सलीम फ्रुट याला एनआयएने अटक केली आहे. सलीम फ्रुट हा कुख्यात खंडणीखोर आणि दाऊद इब्राहिमचा जवळचा सहकारी असलेला छोटा शकील याचा मेव्हुणा आहे. सलीम फ्रुटच्या मागे एनआयएचा ससेमिरा लागलेला असताना विजय काळे याने सलीम फ्रुटला संपर्क केला आणि त्याने स्वतःला एनआयएचा अधिकारी असल्याचे, सांगून अटक टाळण्यासाठी त्याने सलीम फ्रुट याच्याकडून ५० लाख रुपये घेतले. अशी माहिती एनआयएच्या कोठडीत असलेल्या सलीम फ्रुटने एनआयएच्या अधिकाऱ्यांना दिली.

आरोपी अटकेत 

सलीमच्या माहितीवरून एनआयएने विजय काळे याचा शोध घेऊन त्याला दिल्लीतून ताब्यात घेतले. सलिम फ्रुट आणि विजय काळे यांची समोरासमोर चौकशी केली असता हा प्रकार समोर आला. एनआयएने विजय काळे याला मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाच्या ताब्यात देऊन त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. खंडणी विरोधी पथकाने खंडणीचा गुन्हा दाखल करून विजय काळे याला सोमवारी अटक केली.  सलीम फ्रुट याच्यावर मुंबईत अनेक गुन्हे दाखल असून हसीना पारकर आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्यात कुर्ल्यातील वादग्रस्त जमिनीच्या व्यवहारात मध्यस्थी केल्याचे ईडीच्या चौकशीत समोर आले होते. तसेच सलीम फ्रुट याच्या विरोधात टेरर फंडिंग केल्याच्या संशयावरून एनआयएने गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here