चांदीच्या धातूसाठी मारुती इको या मोटारीचे सायलेन्सर चोरी करणाऱ्या टोळ्यांचा पोलिसांनी पर्दाफाश केल्यानंतर, मारुती इको या मोटारीचे ‘इंजिन कंट्रोलर मॉड्युल’ हे मशीन चोरणारी टोळी शहरात सक्रिय झाली होती. भायखळा पोलिसांनी या टोळीचा छडा लावून, चौघांना चोरीच्या ३८ ‘इंजिन कंट्रोलर मॉड्युल’ मशिनसह अटक केली आहे.
मारुती इको या मोटारीला बसवण्यात आलेले सायलेन्सर चांदीच्या धातूचा वापर करण्यात आला आहे, अशी माहिती वाहन चोरी करणाऱ्या टोळ्यांना कळताच या टोळ्यांनी मारुती इको या मोटारीना आपले लक्ष्य केले होते. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या इको या मोटारींचे सायलेन्सर चोरी करून या टोळ्या डबल कमाई करत होत्या. सायनलेन्सर चोरी करून त्यातील चांदीचा धातू वेगळा करून हे सायलेन्सर कमी किमतीत विकत आणि त्यातून काढलेली चांदी विकून बक्कळ पैसा या टोळ्या कमवत होत्या. ठाणे, मुंबई, नवी मुंबई पोलिसांनी या सायलेन्सर चोरांना अटक केल्यानंतर सायलेन्सर चोरीच्या गुन्हयावर नियंत्रण आले.
अशी करत होते चोरी
सायलेन्सर चोरीनंतर मोटारीचे ‘इंजिन कंट्रोलर मॉड्युल’ मशीन चोरी करणाऱ्या टोळ्यांचा उगम झाला. मोटारीचे इंजिन स्टार्ट करण्यासाठी बसवण्यात आलेले ‘इंजिन कंट्रोलर मॉड्युल’ हे मशीन इतर मोटारीच्या खालच्या भागात बसवल्यामुळे काढणे अवघड होते, मात्र मारुतीच्या इको या मोटारीला असलेले ‘इंजिन कंट्रोलर मॉड्युल’ हे चालकाच्या आसनाजवळ असल्याने ते काढणे सोपे होत असल्यामुळे या चोरट्यांनी इको मोटारींना लक्ष्य करून या मोटारीचा दरवाजा उघडून ‘इंजिन कंट्रोलर मॉड्युल’ मशीन चोरी करण्याचा सपाटा सुरू केला होता.
( हेही वाचा: INS Vikrant Scam: उच्च न्यायालयाचा सोमय्या पिता-पुत्राला दिलासा; अटकपूर्व जामीन मंजूर )
मुंबईतील विविध पोलीस ठाण्यामध्ये ‘इंजिन कंट्रोलर मॉड्युल’ चोरीच्या तक्रारी दाखल होत होत्या. भायखळा पोलीस ठाण्यातदेखील या तक्रारी मोठ्या प्रमाणात दाखल होऊ लागल्यामुळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक खोत, पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव यांनी या चोरीचा छडा लावण्यासाठी गुन्हा प्रकटीकरण पथकाला आदेश दिले. गुन्हा प्रकटीकरण पथकाने वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सीसीटीव्ही कॅमऱ्याच्या मदतीने या टोळीचा शोध घेऊन ‘इंजिन कंट्रोलर मॉड्युल’ हे मशीन चोरणाऱ्या तिघांना अटक केली आणि त्यांच्याजवळ पोलिसांना ४ ‘इंजिन कंट्रोलर मॉड्युल’ सापडले. या टोळीकडे कसून चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली देत प्रत्येक मशीन ५ ते ७ हजार रुपयांत गॅरेज मालकांना विकल्याची कबूल केले. पोलीस पथकाने ‘इंजिन कंट्रोलर मॉड्युल’ हे मशीन विकत घेणाऱ्या गॅरेज मालकाला अटक करून त्याच्याजवळून चोरीच्या ३४ मशीन जप्त केल्या आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक खोत यांनी दिली. इमरान खान, शरीफ शेख आणि शोकत अली शेख अशी चोरट्यांची नावं असून, इरफान शेख हे चोरीच्या मशीन विकत घेणा-याचे नाव आहे असे खोत यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community