कॉर्डिलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूड स्टार शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानवर करण्यात आलेल्या कारवाईत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या विशेष तपास पथकाला अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. विशेष पथकाने त्यांचा तपास पूर्ण करून ३ हजार पानांचा दक्षता अहवाल सक्षम अधिका-यांसमोर सादर केला आहे.
विशेष तपास पथकाने या अहवालात ६५ साक्षीदारांचे व्हिडीओ जबाब ५ वेळा घेतले असल्याचे म्हटले आहे. तसेच कॉर्डिलिया ड्रग्जप्रकरणी कारवाई करणाऱ्या ७ ते ८ अधिकाऱ्यांवर अनियमितता आणि गंभीर त्रुटी ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे तत्कालीन मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडे यांच्या कार्यकाळात गोवा येथे निघालेल्या कॉर्डिलिया क्रूझवर छापेमारी करण्यात आली होती. यावेळी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आढळल्याचे सांगण्यात आले होते. याप्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह १३ ते १४ जणांना अटक केली होती. या सर्वांकडे ड्रग्ज सापडल्याचा दावा एनसीबीकडून करण्यात आला होता.
विशेष दक्षता पथकाने या खटल्यातील किमान ६५ साक्षीदारांचे व्हिडीओ जबाब नोंदवले आहेत आणि त्यापैकी काहींचे ५ हून अधिक वेळा जबाब नोंदवले गेले आहेत. कॉर्डेलिया आणि आणखी दोन प्रकरणांशी संबंधित असलेल्या एनसीबीच्या काही अधिकाऱ्यांनी विविध तपशील दिले आहेत. त्यांच्या पूर्वीच्या जबाबात त्रुटी आढळून येत असल्यामुळे त्यांचे जबाब पुन्हा नोंदवण्याची विनंती करण्यात आली आहे. “प्रत्येकाला स्वतःला सादर करण्याची वाजवी संधी देण्यात आली आणि पुराव्याच्या आधारे आम्हाला विविध अनियमितता आढळून आल्या हा अहवाल सक्षम अधिकाऱ्याकडे सादर करण्यात आला.” असे एका अधिकाऱ्याने सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विभागीय कार्यवाहीनुसार आणि केंद्रीय नागरी सेवा (आचार) नियम १९६४ च्या कलमांनुसार अहवाल सादर करण्यात आले आहेत.
Join Our WhatsApp Community