दहशतवादी होणा-या तरुणांचे समुपदेशन करणारे धोरण एटीएसकडून बंद

दोनशेहून अधिक तरुणांना दहशतवादी संघटनामध्ये सामील होण्यापासून वाचवणाऱ्या महाराष्ट्र एटीएसचा समुपदेशन (डिरायडायक्लेशन) कार्यक्रम मागील एक वर्षांहून अधिक कालावधीपासून बंद करण्यात आला आहे. एटीएसने सुरू केलेला समुपदेशन कार्यक्रम म्हणजे एकप्रकारे दहशतवादी संघटनाना चोख प्रत्युत्तर होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून दहशतवादी संघटनांकडे आकर्षित होऊ पाहणाऱ्या एका विशिष्ट धर्माच्या २००पेक्षा अधिक तरुणांना मुख्य प्रवाहात आणण्यात आले होते.
भारतात बंदी असलेल्या ‘डार्कनेट’ या वेबसाईटवर तसेच इतर सोशल माध्यमातून दहशतवादी संघटनांकडून भारतातील एका विशिष्ट धर्माच्या तरुणांची माथी भडकवून त्यांना कट्टरपंथी बनवण्याचा प्रयत्न मागील काही वर्षांपासून सुरू होता. १९९० च्या बॅचचे आयपीएस अधिकारी अतुलचंद्र कुलकर्णी महाराष्ट्र एटीएस प्रमुख असताना २०१६ मध्ये ‘डिरायडायक्लेशन’ पॉलिसी महाराष्ट्रात सुरू करण्यात आली होती. डिरायडायक्लेशन धोरणाचे जगभरात कौतुक झाले आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी २०१९ मध्ये देशातील राज्यांच्या पोलीस महासंचालक यांची बैठक घेऊन सर्व राज्यांना या धोरणाचे पालन करण्यास सांगितले होते.
महाराष्ट्र एटीएसच्या सूत्रांच्या म्हणण्यानुसार, डिरायडायक्लेशन धोरण हे इसिस आणि लष्कर- ए- तोयबासारख्या दहशतवादी संघटनांना योग्य प्रत्युत्तर होते. भारतात बंदी असलेल्या डार्कनेट या वेबसाईटवर असलेल्या दहशतवादी संघटना भारतीय तरुणांना कट्टरपंथी बनवण्याचा प्रयत्न करत होते. एक विशिष्ट धर्म वाचवण्यासाठी त्यांना संघटनांमध्ये सामील होण्यास सांगितले जायचे आणि या तरुणांची माथी भडकावून त्यांना मुख्य प्रवाहातून बाहेर पाडण्याचे काम या संघटना डार्कनेट या वेबसाईटच्या माध्यमातून करायचे.
( हेही वाचा: मुंबईकरांनो सावधान! Video Call करून मुंबईला बॉम्बने उडवण्याची धमकी )

एटीएस अशा प्रकारच्या वेबसाईट तसेच  सोशल मीडियावर लक्ष ठेवत होते. संशयास्पद तरुणांच्या छोट्याछोट्या हालचालींवर एटीएसचे अधिकारी लक्ष ठेवून होते. हा तरुण भरकटला जात असल्याचे लक्षात येताच अशा तरुणांवर लक्ष ठेवून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एटीएसकडून प्रयत्न केले जायचे. या तरुणांना समुपदेशन करण्यासाठी त्यांचे धार्मिक नेते आणि धर्मगुरूंची मदत घेतली जात होती व या तरुणांना मुख्य प्रवाहात आणले जात होते असे एटीएस अधिकाऱ्याने सांगितले.
डिरायडायक्लेशन धोरण कोरोना काळापासून बंद करण्यात आले आहे.  हे धोरण बंद करणे हे मोठे नुकसान असल्याचे मत एटीएसमधील काही अधिकारी मांडत आहेत. मात्र, हे धोरण का बंद करण्यात आले आहे यावर भाष्य करण्यास कुठलाही अधिकारी तयार नाही. जे तरुण दहशतवादी संघटनांचे लक्ष्य होते, त्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणून त्यांचा विश्वास निर्माण करणे हा या धोरणामागचा उद्देश होता असेही अधिकारी सांगतात.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here