पोलीस आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षातील डायल 112 वर आलेल्या एका काॅलमुळे यूपीतील एका खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा झाला असून, आरोपीला वालीव पोलिसांनी सातीवली परिसरातून रविवारी पकडले. आरोपीकडून मृतदेहाची विल्हेवाट लावलेली माहिती मिळाली असून, यूपी पोलीस मृतदेहाचा शोध घेत आहेत. या आरोपीला पुढील तपासासाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
रविवारी सकाळी 8 वाजून 20 मिनिटांनी नियंत्रण कक्षाच्या डायल 112 वर काॅल आला आणि त्याने सांगितले की, त्याच्या मेव्हण्याने यूपीमध्ये एकाची हत्या केली असून, तो सातीवली परिसरात येणार आहे. ही माहिती बीट मार्शल राजेंद्र काकडेला मिळाली. त्याने वालीव गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी आणि अंमलदार यांच्याशी संपर्क साधला.
आरोपीने दिली खुनाची कबूली
सातीवलीच्या आदर्शनगरमधील भवानी मेडिकलजवळ सापळा रचून पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले. नसीर सफाते (31) असे याचे नाव असून, अधिक चौकशीसाठी वालीव पोलीस ठाण्यात आणले. चौकशी केल्यावर आरोपीने विवाहबाह्य संबंधातून प्रेमिका कांचन गुप्ताचा पती नंदलाल गुप्ता याचा 25 मे रोजी रात्रीच्या सुमारास दोघांनी मिळून धारदार शस्त्राने गळा कापून खून केल्याची माहिती दिली.
( हेही वाचा: सैन्य भरतीचे नियम बदलणार; आता 4 वर्षांच्या सेवेनंतर निवृत्ती )
हत्येचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
वरिष्ठ पोलीस निरिक्षक कैलास बर्वे यांनी बस्तीचे पोलीस अधिक्षक राजेश मोदक यांच्याशी संपर्क साधल्यावर, सोनहा पोलीस ठाण्यांतर्गत हत्येचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असून, अद्यापपर्यंत मृतदेह मिळाला नसल्याची माहिती मिळाली. आरोपीकडून मिळालेली मृतदेहाची माहिती सांगितल्यावर यूपी पोलीस मृतदेहाचा शोध घेत आहेत.
Join Our WhatsApp Community