मुंबईत सायबर गुन्ह्याची वाढती व्याप्ती, एका महिन्यात ३ हजार गुन्ह्यांची नोंद

166
मुंबईत सायबर गुन्ह्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. जुलै महिन्यात मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये ऑनलाइन फसवणूक, सेक्सटोर्शन संबंधित २ हजार ९५३ गुन्हे नोंदवले गेल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. त्यापैकी केवळ १४१ गुन्हे उघडकीस आले आहेत. जून महिन्यात २ हजार ५०६ गुन्ह्यांची नोंद झाली होती. त्यात १२० गुन्हे उघडकीस आले होते. एप्रिल २०२२ पासून सायबर गुन्ह्यांची संख्या झपाट्याने वाढत असून, दररोज काही पोलीस ठाण्यांमध्ये सायबर गुन्ह्याचे ५ ते ६ प्रकरणे दाखल होत आहेत. या गुन्ह्याचे केंद्रबिंदू झारखंड, जामताडा, राजस्थान असल्यामुळे गुन्ह्याची उकल होण्यास अनेक अडचणी समोर येत असल्याचे एका पोलीस अधिका-याचे म्हणणे आहे.
मुंबईत सायबर गुन्हयांमध्ये दररोज मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्यामुळे चिंतेचे वातावरण पसरले आहे. मुंबईत असलेल्या ९६ पोलीस ठाणी, ५ सायबर पोलीस ठाणी असे मिळून एकूण १०१ पोलीस ठाणे आहेत. या पोलीस ठाण्यात दररोज सरासरी ५ ते ६ Like online fraud, online sextortion, loan app गुन्हे दाखल होत आहे. जानेवारी ते जून २०२२ या सहा महिन्यांत ७ हजार ७१९ गुन्ह्यांची मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात नोंद झालेली आहे. त्यापैकी ४१० गुन्ह्यांची उकल पोलिसांनी केली आहे. मार्च, एप्रिल,मे ,जून आणि जुलै या पाच महिन्यात सायबर गुन्ह्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. जून आणि जुलै या दोन महिन्यांत सर्वाधिक गुन्हे वाढले असून पुढे या गुन्ह्यांची आकडेवारी वाढतच जाणार असल्याचे एका पोलीस अधिका-यांचे म्हणणे आहे.
जून महिन्यात २ हजार ५०६ गुन्हे दाखल झाले होते.  जुलै महिन्यात ही संख्या ४५० ने वाढून २ हजार ९५३ इतकी झाली आहे. सायबरचे गुन्हे उघडकीस येण्याची संख्या सर्वात कमी असून, मागील सात महिन्यात दाखल झालेल्या १० हजार ६७२ सायबर गुन्ह्यांपैकी केवळ ५४२ गुन्ह्यांची उकल करण्यास मुंबई पोलिसांना यश आले आहे. याबाबत एका वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत सायबर गुन्ह्याची वाढती आकडेवारी ही चिंताजनक बाब आहे. सायबर गुन्ह्याची उकल करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. एकतर हे गुन्हेगार राज्याच्या बाहेर असल्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहचण्यापर्यंत ते फरार होतात.  गावात या गुन्हेगारांचे नेटवर्क एवढे स्ट्रॉंग आहे की बाहेरील अनोळखी व्यक्ती गावाकडे येत असल्याचे कळताच गुन्हेगार रफुचक्कर होतात. त्याचबरोबर गावात पोलिसांवर हल्ले केले जातात. सायबर गुन्ह्याचे मुख्य केंद्रबिंदू हे झारखंड राज्यातील जामताडा, राजस्थानमधील भरतपूर तसेच उत्तर प्रदेश या राज्यातील दुर्गम असलेल्या खेड्यात आहेत. येथील यंत्रणेकडून वेळेवर कुठलीही मदत मिळत नसल्यामुळे या सायबर गुन्हेगारांपर्यत पोहचणे  अवघड होते, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
सायबर गुन्ह्याची व्याप्ती एवढी मोठी असून हे गुन्हे उघडकीस आणून आरोपींना अटक करण्यासाठी परराज्यात जावे लागते. त्यासाठी  सायबर विभागाला आर्थिक अडचणींचा मोठा सामना करावा लागत असल्याचे, दुसऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितले. मनुष्यबळ हा एक मुद्दा असून सायबर विभाग अथवा पोलीस ठाण्यात मनुष्यबळ अभावी गुन्ह्यांची उकल करण्यास अडचणी येत असल्याचे अधिका-यांचे म्हणणे आहे.
मुंबईत ज्या पद्धतीने सायबर पोलीस ठाण्याची स्थापना करण्यात आली, त्या सायबर पोलीस ठाण्यात मनुष्यबळ, तांत्रिक अडचणी आणि आर्थिक अडचण मोठ्या प्रमाणात भासत असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. मुंबईतील प्रत्येक पोलीस ठाण्यात सायबर सेल तयार करण्यात आले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाचा एक अधिकारी आणि एक अंमलदार एवढेच मनुष्यबळ सायबर सेलला देण्यात आले आहे. मुंबईतील ज्या पोलीस ठाण्यात सायबरचे मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल होत आहेत. त्या पोलीस ठाण्यात सायबर सेलसाठी एक पोलीस निरीक्षक दर्जाचा अधिकारी नेमण्यात आला असून त्याखाली दोन अधिकारी आणि काही अंमलदार देण्यात आले आहेत.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.