नागपुरात 35 वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार; पीडिता गंभीर

80

नागपुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मदतीचे आश्वासन देत 35 वर्षीय महिलेवर तीन नराधमांनी दोन ठिकाणी नेऊन अत्याचार केले. एवढ्यावरच न थांबता या नराधमांनी महिलेला रस्त्याकाठी फेकून दिले आणि तिथून पळ काढला. सध्या महिलेवर नागपूर वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली असून, एक आरोपी अद्याप फरार आहे.

पीडित महिला पतीपासून विभक्त झाली होती. नुकतीच ती गोंदियामध्ये राहणा-या तिच्या बहिणीकडे आली होती. 30 जुलैला बहिणीसोबत भांडण झाल्याने, महिलेने रात्रीच्या सुमारास घर सोडले. रस्त्यात भेटलेल्या अज्ञात आरोपीने तिला घरी सोडण्याच्या बहाण्याने कारमध्ये बसवले. पण नराधमाने तिला घरी न सोडता, गोंदिया जिल्ह्याच्या मुंडीपार जंगलात नेऊन 30 जुलैला तिच्यावर पाशवी अत्याचार केला. एवढ्यावरच हा नराधम थांबला नाही, त्याने दुस-या दिवशीही म्हणजेच, 31 जुलैला पळसगाव जंगलात नेऊन अत्याचार केला. त्यानंतर पीडितेला तिथेच सोडून आरोपीने पळ काढला.

त्यानंतर पीडिता कशीबशी निघून भंडा-यातील लाखनी तालुक्यातील कन्हाळमोह गावातील धर्मा ढाब्यावर पोहोचली. तिथे दुचाकी दुरुस्त करणा-या आरोपीसोबत तिची भेट झाली. त्यानंतरही घरी सोडण्याच्या बहाण्याने पीडितेवर पाशवी अत्याचार केले. आरोपीने आपल्या एका मित्राला सोबत घेत, 1 ऑगस्ट रोजी पीडितेला निर्मनुष्य ठिकाणी नेत पीडितेवर वारंवार अत्याचार केले. त्यानंतर पीडितेला कारधा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणा-या कन्हाळ मोग गावाच्या पुलाजवळ सकाळी 8 वाजता विवस्त्र अवस्थेत सोडून तिथून पळ काढला. रात्रभर पीडिता असह्य वेदनांनी विव्हळत रस्त्याशेजारी पडून होती.

पीडिता गंभीर; प्रत्येक श्वासासाठी झुंज सुरु

भंडारा जिल्ह्यातील कारधा पोलीस स्टेशन अंतर्गत कनहाडमोह गावाजवळ झालेल्या सामूहित बलात्कार प्रकरणातली पीडितेची अवस्था गंभीर आहे. रक्तस्त्राव थांबवण्यासाठी डाॅक्टरांनी तिच्यावर शस्त्रक्रिया केली असून, आणखी शस्त्रक्रिया कराव्या लागणार असल्याची माहिती आहे. महिलेची प्रकृती चिंताजनक आहे. पीडितेने सांगितल्याप्रमाणे, भंडारा जिल्ह्याच्या कारधा पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, आरोपींविरुद्ध कलम 376 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कारधा पोलीस करत आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.