मानखुर्द, ट्रॉम्बे बनले चोरीचे मोबाईल विकणा-यांचा अड्डा

104
रेल्वे प्रवासी, पादचारी यांचे चोरलेले महागडे मोबाईल फोन विकत घेणाऱ्या टोळ्या गोवंडी शिवाजी नगर, मानखुर्द लल्लूभाई कंपाउंड येथे मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत. चोरलेले मोबाईल कवडीमोल भावात खरेदी करून या मोबाईलची विक्री नेपाळ,बांग्लादेशात  केली जात असल्याचे समोर आले आहे. मागील काही महिन्यांपासून मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा, मानखुर्द आणि ट्रॉम्बे पोलिसांनी या भागातून मोठ्या प्रमाणात चोरीचे मोबाईल फोन जप्त करून चोरलेले मोबाईल फोन विक्री आणि खरेदी करणाऱ्या टोळ्यांना अटक करण्यात आली असून यामध्ये महिलांचादेखील समावेश आहे.

या भागांत चोरीचे मोबाईल विकत घेणा-या टोळ्या सक्रिय

मुंबईत दररोज शेकडो मोबाईल फोनची चोरी होत असल्याच्या तक्रारी मुंबईतील विविध पोलीस ठाणे, रेल्वे पोलीस ठाण्यात दाखल होत आहे. गर्दीच्या ठिकाणी, ट्रेन, बसमध्ये, रस्त्याने चालताना अनेकांचे मोबाईल फोन चोरीला जात असल्याच्या ढीगभर तक्रारी दररोज विविध पोलीस ठाण्यात दाखल होत आहे. हजारो, लाखो रुपये किमतीचे मोबाईल एका झटक्यात उडवून नेणाऱ्या टोळ्या शहरात आणि रेल्वेच्या हद्दीत सक्रिय झाल्या आहेत. मोबाईल फोन चोरणाऱ्यांबरोबर विकत घेणाऱ्या टोळ्या शहरासह उपनगरात सुळसुळाट झाला आहे. चोरलेले मोबाईल विकत घेणाऱ्या सर्वाधिक टोळ्या पूर्व उपनगरातील शिवाजी नगर, मानखुर्द आणि ट्रॉम्बे शहरात सक्रिय असल्याचे, मागील काही महिन्यांत पोलिसांनी केलेल्या कारावाईत समोर आले आहे.

गुन्हे शाखा कक्ष ६ ची कारवाई

गुन्हे शाखा कक्ष ६ च्या पथकाने गेल्या महिन्यात मानखुर्द ट्रॉम्बे या ठिकाणी कारवाई करून चोरीचे मोबाईल घेणाऱ्या तिघांना अटक करून सुमारे ५०० मोबाईल फोन जप्त केले. त्यापाठोपाठ कक्ष ६च्या पथकाने याच गुन्हयात मोबाईल फोन चोरणा-या टोळ्यांचा छडा लावून ८ जणांना अटक करून त्यांच्याजवळून १४० मोबाईल फोन जप्त केले आहेत.

मानखुर्द आणि ट्रॉम्बे पोलिसांची कारवाई

गुन्हे शाखे पाठोपाठ मानखुर्द आणि ट्रॉम्बे पोलिसांनी केलेल्या कारवाईत सुमारे १५० मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून मोबाईल विकत घेणारे व चोरणाऱ्या १० जणांना अटक केली आहे. मोबाईल विकत घेणारी टोळी शिवाजी नगर, ट्रॉम्बे चिता कॅम्प आणि चोरणारी टोळी ही मानखुर्द लल्लूभाई कंपाउंड येथे राहणारी आहे.

रिपेअरिंगच्या नावाखाली खरेदी विक्रीचा धंदा

शिवाजी नगर, लल्लूभाई कंपाऊड, चिताकॅम्प  या परिसरात मोबाईल फोन दुरुस्ती करण्याचे टपरीवजा दुकानं या टोळ्या थाटून बसलेल्या आहेत. मोबाईल चोर चोरलेले मोबाईल फोन या दुकानांमध्ये आणून विकतात. चांगल्या अवस्थेत असणारे १० हजार किमतीचे मोबाईल फोन तीन हजार, २० हजारांचे फोन ६ ते ७ हजार रुपयांत, तर अॅप्पल कंपनीचा ५० हजार रुपये किमतीचा फोन १० ते १५ हजार रुपयांमध्ये या दुकानांमधून विकत घेतले जातात. त्यानंतर या मोबाईलचा आयएमआय क्रमांक काढून या मोबाईलची रवानगी खाजगी ट्रॅव्हल्स बसने नेपाळ, बांगलादेश, कोलकत्ता, उत्तर प्रदेश या ठिकाणी मोठ्या संख्येने केली जाते. यामागे मोठे सिंडिकेट कार्यरत आहे. मोबाईल चोरणारी टोळी, विकत घेणारी टोळी, मुंबईतून कुरिअर कंपनीमार्फत पाठवणारी आणि देशाच्या सीमेवर हे चोरीचे मोबाईल फोन ताब्यात घेणारी टोळी आणि त्यानंतर देशाच्या सीमेरेषेवरून दुसऱ्या देशात हे मोबाईल पाठवणाऱ्या टोळ्या या धंद्यात कार्यरत असल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. नेपाळ, बांगलादेशात सर्वाधिक मोबाईल फोनची मागणी आहे. या देशात चोरीच्या मोबाईलचे मोठे मार्केट असून, त्या ठिकाणी हे मुंबईसह ठाणे नवीमुंबईतून चोरलेले मोबाईल फोन पाठवले जातात.
( हेही वाचा: भारतीय पोस्टात नोकरीची सुवर्णसंधी! परीक्षेविना केली जाणार निवड )

सोनसाखळी चोर मोबाईल चोरीच्या धंद्यात 
महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून पळणारी टोळी, तसेच रेल्वेत भुरट्या चोऱ्या करणारी टोळी, घरफोड्या करणाऱ्या टोळ्या मोबाईल चोरीच्या धंद्यात उतरल्या आहेत. इतर गुन्ह्यांपेक्षा मोबाईल चोरीच्या गुन्हयात धोका कमी असल्यामुळे तसेच चोरलेला मोबाईल विकत घेणाऱ्या टोळ्याकडून चांगली किंमत मिळत असल्यामुळे अनेक चोरटे मोबाईल चोरी करत असल्याचे समोर आले आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.