अश्लील चित्रपटांनी बनवले त्याला ‘सिरीयल मॉलेस्टर’ ११ वर्षांत केले एवढे गुन्हे

अश्लील चित्रपट बघून आल्यानंतर लहान मुलींना लक्ष्य करणाऱ्या एका ‘सिरीयल मॉलेस्टर’ला मिरा-भाईंदर पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. ९ वर्षांच्या मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या गुन्हयात त्याला अटक करण्यात आली आहे. कल्पेश देवधरे (३०) असे अटक करण्यात आलेल्या ‘सिरीयल मॉलेस्टर’चे नाव आहे. कल्पेश याच्यावर मुंबईत २० गुन्ह्यांची नोंद असून, त्यात सर्वाधिक गुन्हे विनयभंग, अपहरणाचे असल्याची माहिती समोर आली आहे.
मिरा रोड येथील नया नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत १८ एप्रिल रोजी एका ९ वर्षांच्या मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती. या घटनेने संपूर्ण मिरा रोड शहर हादरले होते. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. नयानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच मिरा- भाईंदर गुन्हे शाखा युनिट १चे पोलीस निरीक्षक अविनाश कुराडे यांनी आपल्या पथकासह आरोपीचा शोध सुरू केला होता.

२०० सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले

तपास पथकाने प्रथम घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळापासून ते मिरा रोड रेल्वे स्थानक, बस स्टँड, रिक्षा स्टँडसह शहरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. सुमारे २०० सीसीटीव्ही फुटेज तपासत असताना, तपास पथकाला फुटेजमध्ये एक संशयित व्यक्ती आढळून आला. तपास पथकाने या व्यक्तीची माहिती काढली असता घटना घडल्यानंतर आरोपी हा मिरा रोड रेल्वे स्थानकातून मुंबईच्या दिशेने जाताना दिसून आला. पोलिसांनी त्याचा माग काढत त्याला नालासोपारा येथून ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

तब्बल २० गुन्ह्यांची दिली कबुली 

अटक करण्यात आलेल्या कल्पेश देवधरे याने पोलिसांच्या चौकशीत २० गुन्ह्यांची कबुली दिली आहे. कांदिवली पश्चिमेत राहणारा कल्पेश हा वाहन चालक असून, त्याच्यावर २०११ पासून कांदिवली, दिंडोशी, गोरेगाव, पंतनगर, चुनाभट्टी, पवई, पार्कसाईड, बांगुर नगर, सायन, कस्तुरबा मार्ग, डी. एन. नगर, विलेपार्ले, गोवंडी आणि माणिकपूर पोलीस ठाण्यात २० पेक्षा अधिक विनयभंग, अपहरण, फसवणुकीचे गुन्हे असल्याची माहिती मिरा भाईंदर गुन्हे शाखेने दिली आहे.

१६ व्या वर्षी जडले अश्लील चित्रपटाचे व्यसन 

कल्पेशला वयाच्या १६ व्या वर्षांपासून अश्लील चित्रपट बघण्याचे व्यसन जडले होते. चित्रपट बघून बाहेर पडल्यावर तो आपले सावज शोधत फिरायचा एकट्या दुकट्या अल्पवयीन मुलींना गाठून त्याच्यांसोबत अश्लील कृत्य करीत होता. मागील अकरा वर्षांत त्याने अनेक मुलीचा आणि महिलांचा विनयभंग केल्याचे उघडकीस आले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here