आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्कर कैलास राजपूतला भारतात आणण्यासाठी हालचाली

86
मुंबई-आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्कर कैलास राजपूतला भारतात आणण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणेकडून हालचाल सुरू करण्यात आल्या आहेत. कैलास राजपूतचा लंडनमध्ये पासपोर्ट जप्त करण्यात आला असून त्याला नजरकैदेत ठेवण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राजपूतला भारतात आणण्यात यश येताच मुंबई पोलीस त्याचा ताबा मिळवण्याच्या प्रयत्नात आहे.
कैलास राजपूत हा ड्रग्ज तस्करीत भारतातील सर्वात मोठा तस्कर समजला जातो. भारतात मफेड्रोन (एमडी) सर्वात मोठा पुरवठादार म्हणून कैलास राजपूत याच्यावर भारतात अनेक गुन्हे दाखल आहेत. मुंबई पोलिसांनी राजपूतला अटक केली होती. २०१४ मध्ये जामिनावर बाहेर येताच तो दुबईत पळून गेला होता. त्यानंतर तो अनेक वेळा वेषभूषा करून भारतात येऊन गेला असल्याची माहिती समोर आली होती.

मुंबई पोलीस घेणार राजपूतचा ताबा

मूळचा राजस्थान राज्यातील कैलास राजपूत सध्या कुटुंबासोबत लंडनमध्ये वास्तव्यास आहे. मुंबईसह देशभरात कैलास राजपूत हा ड्रग्जच्या धंद्यातील किंग समजला जातो. मुंबईत त्याच्यावर अमली पदार्थ पुरवठा केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने कैलास राजपूतचे मुंबईतील अमली पदार्थांचे काळे धंदे उध्वस्त करून कोटयावधींचा अमली पदार्थ जप्त केला होता. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या ड्रग्स पेडलर आणि डीलर यांच्या चौकशीत कैलास राजपूत याचे नाव पुढे आले होते. लंडन पोलिसांनी काही आठवड्यांपूर्वी  कैलास राजपूत याचा पासपोर्ट जप्त केला असून त्याला नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. राजपूत याला भारतात आणण्यासाठी हालचाली सुरू झाल्या असून केंद्रीय तपास यंत्रणा विदेश मंत्री यांच्या संपर्कात असून लवकरच लंडनमधून त्याला भारतात आणले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान मुंबई पोलीसदेखील कैलास राजपूत याचा ताबा घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

एनसीबीच्या रडारवर कैलास राजपूत

ड्रग्ज माफिया चिंकू पठाण, आरिफ भुजवाला आणि त्याच्या सहकाऱ्याच्या अटकेनंतर कैलास राजपूत याचे नाव पुन्हा चर्चेत आले आणि ड्रग्जचे अंडरवर्ल्डशी असणारे नाते समोर आले आहे. एकेकाळी या गुन्हेगारी जगताचा बादशहा समजला जाणारा दाऊद इब्राहिम याचा एकेकाळचा मुंबईतील बालेकिल्ल्या डोंगरी येथे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी)चे मुंबई विभाग संचालक समीर वानखेडे यांनी छापा टाकून ड्रग्जचा कारखाना उध्वस्त केला होता. दरम्यान डोंगरी आणि दाऊदचे कनेक्शन समोर आले असून भुजवाला हा कैलास राजपूत आणि अनिस इब्राहिम याच्या इशाऱ्यावर मुंबईत ड्रग्जचा व्यापार चालवत होता.
कैलास राजपूत हा लंडनमध्ये लपून बसल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या हाती लागली होती. त्याला भारतात आणण्यासाठी
२०१९ मध्ये या अंडरकव्हर ऑपरेशन करण्यात येणार होते. त्यासाठी उच्चस्तरावर बोलणी सुरू होती. हे अंडरकव्हर ऑपरेशन अमली पदार्थ विरोधी पथकाचे तत्कालीन पोलीस उपायुक्त शिवदीप लांडे मार्गदर्शनात होणार होते. या ऑपरेशनची भनक लांडे सोडून कुणालाही लागू दिलेली नव्हती. २०२० मध्ये हे अंडरकव्हर ऑपरेशन होणार होते, त्याला ‘ ऑपरेशन बेबी’ हे नाव देण्यात आले होते. विश्वासातील अधिकाऱ्यांची जुळवाजुळव झाली होती, परंतु या अधिकाऱ्यांना तिकडे जाऊन कुणाला भेटायचे, कुणाला भारतात आणायचे याची साधी कल्पना दिली गेली नव्हती. केवळ त्यासाठी ६ अधिकाऱ्यांचे पथक हे  ऑपरेशन बेबी यशस्वी करणार होते. मुंबई गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या ऑपरेशन बेबीसाठी हिरवा कंदील दिला होता. ऑपरेशन बेबी या पथकातील अधिकाऱ्यांचे दुबई जाण्याचे तिकीट देखील बुक झाले होते आणि त्याचवेळी कोरोना या आजाराने डोके वर काढून संपूर्ण जगात थैमान घातल्यामुळे भारतातदेखील लॉकडाऊन लागला आणि ऑपरेशन बेबीला ब्रेक लागला.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.