‘पीएफआय’वरील बंदीचे स्वागत करणे उत्तरप्रदेशातील एका मौलवीला महागात पडले आहे. राज्यातील बरेली इथले मौलवी शहाबुद्दीन रजवी यांना पीएफआय समर्थकांनी ठार मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे.
बरेली येथील मौलाना शहाबुद्दीन रजवी यांनी ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’वरील (पीएफआय) बंदीनंतर निवेदन जारी करत बंदीचे स्वागत केले होते तसेच सरकारचे आभार मानले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून त्यांना ठार मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या. आला हजरत दरगाह बरेली व ऑल इंडिया मुस्लीम जमातचे अध्यक्ष असलेल्या मौलवी शहाबुद्दीन यांना दिवसभर फोनवर धमक्यांचे सत्र सुरू झाले. मौलवी शहाबुद्दीन रिजवी जिहादी मानसिकतेच्या लोकांचा सातत्याने विरोध करतात. यापूर्वी राजस्थानातील उदयपूर येथे जिहादींनी कन्हैयालालची हत्या केल्यानंतर मौलवींनी त्याचा निषेध नोंदवला होता. त्यावेळी देखील त्यांना धमकावण्यात आले होते.
( हेही वाचा: ठाकरे गटाला धक्का; ज्यांनी एकनिष्ठतेचे प्रमाणपत्र दिले त्यांनीच शिंदे गटात केला प्रवेश )
सततच्या धमकीने भीतीचे वातावरण
यासंदर्भात मौलवी शहाबुद्दीन म्हणाले की, गेल्या अनेक दिवसांपासून ते पीएफआयच्या विरोधात बोलत आहेत. त्यामुळे जिहादी मानसिकतेचे लोक अतिशय संतप्त झाले आहेत. पीएफआयवरील बंदीचे स्वागत केल्यानंतर दिल्लीतील शाहीन बाग येथून अब्दुल स्समद नामक इसमाने त्यांना फोन करून ठार मारण्याची धमकी दिली. सातत्याने धमकी मिळत असल्याने मौलवी आणि त्यांचे कुटुंबिय चिंतेत पडले आहेत. दरम्यान याप्रकरणी शहाबुद्दीन रजवी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुरक्षेची मागणी केली आहे. तसेच धमकी देणाऱ्याचा मोबाईल नंबरही पोलिसांना देण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community