पोलिसच जेव्हा खुनी बनतात…

137
पोलिसांच्या गुन्हेगारीचे अनेक किस्से वाचले असतील किंवा ऐकले असतील. एखादा गुन्हा केल्यानंतर पुरावे कसे नष्ट करता येतील किंवा आपण त्यात कसे अडकणार नाही, याचे ज्ञान पोलिसांना थोडं जास्तच असतं. या ज्ञानाच्या गैरवापर करून पोलिसच गुन्हे करत असल्याचे प्रमाण वाढत असल्याचे काही घटनांवरून दिसत आहे.
ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथे नुकतीच एक घटना समोर आली आहे. ठाणे पोलीस दलात असणाऱ्या एका पोलीस कॉन्स्टेबलने ५० वर्षांच्या महिलेची हत्या केली आणि तीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याऐवजी तो स्वतःच्या मोटारीत मृतदेहाला घेऊन ४८ तास फिरत होता. मृतदेह कुजू लागल्यामुळे त्याचे हे कृत्य बाहेर आले आणि त्याला अटक करण्यात आली.

म्हणून केला खून

मृत महिला ही औरंगाबाद येथील राहणारी होती. तिने पोलीस कॉन्स्टेबल सचिन खाजेकर याला व्याजाने पैसे दिले होते. पैसे परत करण्यासाठी तिने सचिनकडे तगादा लावला होता. पैसे वसूल करण्यासाठी ती त्याला ब्लॅकमेल करत होती. दोन दिवसांपूर्वी ती पैसे वसुलीसाठी उल्हासनगर येथे सचिन खाजेकरकडे आली होती. त्याने तिला पैसे परत करण्याऐवजी थेट तिची गळा आवळून हत्या केली आणि  मृतदेह स्वतःच्या खाजगी वाहनात ठेवला. ४८ तास उलटून गेल्यानंतर मृतदेह कुजू लागला आणि त्याचा दुर्गंध सर्वत्र पसरल्यानंतर या हत्येचा उलगडा झाला. हिल लाईन पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. मात्र त्याने हे कृत्य कुठे केले? तिला कुठे मारले? याबाबत तो पोलिसांना काहीच माहिती देत नसल्यामुळे तपास करणे पोलिसांना अवघड होऊन बसले आहे.

पोलीस अधिकारी बिंद्रे यांचा खून

नवी मुंबईतील महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे यांचा खूनदेखील एका पोलीस अधिका-यानेच केला. बिद्रे यांचा खून केल्यानंतर त्याने तिचे तुकडे करून समुद्रात फेकल्याचे तपास अधिका-यांना सांगितले. मात्र, आजपर्यंत बिद्रे यांच्या मृतदेहाचा अथवा तिच्या शरीराचा कुठलाही भाग तपास यंत्रणेला मिळू शकलेला नाही.
अँटॉप हिल येथील सहायक पोलीस आयुक्त कार्यालयाच्या मागे गेल्यावर्षी एक इसमाचा मृतदेह आढळला होता. या इसमाची हत्या सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या पोलीस वाहनावर चालक असलेल्या पोलीस हवालदारानेच केल्याचे समोर आले होते. तो रात्रभर मृतदेह घेऊन मुंबईभर फिरला आणि अखेर मृतदेह टाकून जाळण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी त्याला आणि त्याची पत्नी या दोघांना अटक करण्यात आली होती.

सचिन वाझे प्रकरण 

मुंबई पोलिसांना ज्याच्यामुळे शरमेने मान खाली घालावी लागली, तो बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने तर संपूर्ण राज्य आणि देशाला हादरवून सोडणारे कृत्य केले. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ पार्क केली. त्यानंतर आपल्या या कृत्यात सहकारी अधिका-यांना सामील करून घेतले आणि हे कृत्य उघड होण्याचे चित्र दिसताच,  स्कॉर्पिओचा मालक आणि मित्र मनसुख हिरेन याची हत्या करून मृतदेह खाडीत फेकला. आपण पोलीस असल्यामुळे आपल्याला कोण पकडणार या भ्रमात असणाऱ्या वाझेच्या भ्रमाचा भोपळा मात्र राष्ट्रीय तपास यंत्रणेने फोडला आणि त्याच्या इतर सहकारी पोलीस अधिका-यांसह त्याला अटक करण्यात आली.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.