JCB च्या साहाय्याने भिंत पाडून दवाखान्यात चोरी 

143
अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास एका दवाखान्याची भिंत पाडून चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार डोंबिवलीत उघडकीस आला आहे. चोरट्यांनी दवाखान्यातील वैद्यकीय सामुग्रीची नासधूस करून ४२ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची तक्रार डॉक्टर दिनेश म्हात्रे यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात केली आहे.
डोंबिवली पूर्वेतील सुनील नगर परिसरात राहणारे डॉक्टर दिनेश म्हात्रे यांचा स्टार कॉलनी हॉटेल मुकांबिकासमोर असणाऱ्या मारुती दर्शन इमारतीच्या तळमजल्यावर दवाखाना आहे. काही दिवसांपूर्वी डॉ. म्हात्रे हे मुलीच्या वैद्यकीय प्रवेशासाठी बाहेरगावी गेले होते. त्यामुळे दवाखाना काही दिवस बंद होता. २६ जून रोजी डॉक्टर रात्री उशिरा घरी परतले असता सकाळी त्यांना दवाखान्याजवळ राहणाऱ्या एका व्यक्तीने फोन करून तुमच्या दवाखान्यात चोरी झाली असल्याचे सांगताच डॉ. म्हात्रे हे दवाखान्यात आले असता त्यांना धक्काच बसला. त्यांच्या दवाखान्याची भिंत पाठीमागून पाडण्यात आली होती, तसेच दवाखान्यातील वैद्यकीय सामुग्रीची नासधूस झाली होती. दवाखान्यात असलेली ४२ हजार रुपयांची रोकड गायब होती.

( हेही वाचा उदयपूर हत्याकांड हा धडा आहे का? आणखी असे हल्ले होऊ शकतात? )

अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
दवाखान्याची मजबूत भिंत पाडून ज्या पद्धतीने दवाखान्यातील सामुग्रीचे नुकसान करण्यात आले होते, त्यासाठी जेसीबीची मदत घेतल्याचा संशय डॉ. म्हात्रे यांना आला म्हणून त्यांनी प्रथम केडीएमसीमध्ये जाऊन चौकशी केली. केडीएमसीकडून तोडफोडीची कुठलीही कारवाई केली नसल्याचे समजले. तसेच कारवाई करायची असती तर दिवसा केली असती, रात्रीची नाही असे त्यांना केडीएमसीमधून सांगण्यात आले. त्यानंतर डॉ. म्हात्रे यांनी थेट मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन घरफोडी झाल्याची तक्रार दाखल केली. मानपाडा पोलीसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला असून, परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्याचे काम सुरू असल्याचे पोलीसांनी सांगितले.
डॉ. म्हात्रे यांचा दवाखाना ज्या इमारतीत आहे, ती इमारत पगडी सिस्टमवर आहे व ही इमारत धोकादायक म्हणून घोषित करण्यात आलेली असून, या इमारतीचे वरील मजले यापूर्वी पाडण्यात आले आहेत. इमारत पुनर्विकास या विषयातून  ही घटना घडल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे. डॉ. म्हात्रे यांनी यासंदर्भात आपण पोलीस ठाण्यातील तक्रारी बरोबर कायदेशीर प्रक्रिया सुरू करणार असल्याचे सांगितले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.