महाराष्ट्र निसर्ग उद्यानातील मगर तलावातून पुन्हा मिठी नदीत?

डम्पिंग ग्राऊण्डवर उभारलेल्या धारावीतील महाराष्ट्र निसर्ग उद्यानात वर्षाअखेरीस मगर दिसून आली. उद्यानातील तलावात वास्तव्य करणा-या मगरीने पुन्हा नजीकच्या मिठी नदीतील दलदलीत प्रवेश केल्याचे बोलले जात आहे. प्रत्यक्षात मगर नदीत जाताना उद्यानातील अधिका-यांनी पाहिलेली नाही. नदीत मगर दिसून येत असल्याने आणि तलावात दिसणारी मगर गायब झाल्याने नेमका काय प्रकार घडलाय, याबाबत उद्यान प्रशासन तसेच वन्यजीव अभ्यासकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया आहे.

ऑक्टोबर महिन्यापासून नदीपात्रात मगरीचे दर्शन

गेल्या वर्षी पहिल्यांदा ऑक्टोबर महिन्यात उद्यानाला लागून असलेल्या मिठी नदीपात्रातील दलदलीच्या भागांत मगर निसर्गतज्ज्ञांना दिसली होती. कालांतराने मगर गायब झाली. २४ डिसेंबरला मगरीचे दर्शन मिठी नदीपात्रात झाले. पाच दिवसांनी मगर हाकेच्या अंतरावरील उद्यानातील तलावात आढळली.

मगरीला तलावाबाहेर काढण्याचे प्रयत्न

उद्यानातील तलावाला कुंपण लावले आहे. मिठी नदी आणि तलावाला पाण्याची एक पाईपलाईन जोडली गेली आहे. या पाईपलाईनमधूनच मगर मिठी नदीत आल्याचा दावा उद्यानातील अधिकारी करतात. उद्यानातील झाडांना तलावातील पाणी दिले जाते. हे काम कर्मचारी स्वतः करतात. तलावातील मगरीच्या वावरामुळे कर्मचा-यांच्या जीवाला धोका असल्याने उद्यान प्रशासनाने वनविभागाला मगर तलावाबाहेर काढण्याची मागणी केली. याबाबतीत कांदळवन वनविभाग आणि मुंबई प्रादेशिक वनविभागात वेगवेगळे मतप्रवाह मांडले गेले. मगर पकडायची कोणी, यावरुन एकमत न झाल्याने मगर पकडण्याचे दोन्ही विभागांनी टाळले.

गुरुवारपासून मिठी नदीत

गुरुवारपासून मिठी नदीच्या दलदलीत उद्यानातील अधिका-यांना मगर दिसली. त्याचवेळी तलावातील मगरीचे दर्शन बंद झाले. अखेरिस सोमवारी मुंबई प्रादेशिक वनविभागाचे वनपरिक्षेत्रपाल राकेश भोईर , मुंबई शहर वनविभागाचे मानद वन्यजीव रक्षक सुनीश कुंजू यांनी महाराष्ट्र निसर्ग उद्यानाला भेट दिली. मगर मिठी नदीत आढळली असल्याची माहिती मुंबई शहर वनविभागाचे मानद वन्यजीव रक्षक सुनीश कुंजू यांनी दिली. मगरीपासून मानवाला होणारा धोका टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत उद्यान प्रशासनाला आम्ही सूचना दिल्या, अशी माहिती कुंजू यांनी दिली. आम्हाला तलावात मगर दिसली नसल्याचे कुंजू यांनी स्पष्ट केले.

मगरीला तलावातून परत मिठी नदीत जाण्यापासून रोखण्यासाठी उद्यान प्रशासनाने पाईपलाईनवर जाळी लावली. पूर्ण वाढ झालेली मगर सात फूटांवरुन उडी मारुन बाहेर जाऊ शकते, अशी माहिती वन्यजीव अभ्यासकांनी दिली. तलावात मुबलक प्रमाणात मासे आहेत. भक्ष्यासाठीच मिठी नदीपात्रातून मगर उद्यानातील तलावात आली असावी, असा दावा वन्यजीव अभ्यासकांनी केला. मगर पुन्हा तलावात येऊ शकते, असेही वन्यजीव अभ्यासकांकडून सांगण्यात आले. या संपूर्ण प्रकरणात मुंबई वनविभागाचे वनपरिक्षेत्रपाल राकेश भोईर यांना सातत्याने संपर्क करुनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. ठाणे वनविभागाचे (प्रादेशिक) उपवनसंरक्षक संतोष सस्ते यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

मगरीबाबत कल्पनाच नाही

धारावीत महाराष्ट्र निसर्ग उद्यानात मगर आढळून आल्याची मला कल्पना नाही. उपवनसंरक्षक तसेच मुंबईच्या वनपरिक्षेत्रपालांकडून माहिती घेऊन अधिकृत प्रतिक्रिया दिली जाईल.
रामाराव, मुख्य वनसंरक्षक, ठाणे वनविभाग (प्रादेशिक)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here