‘मगर’ पकडणार कोण?

153

धारावी येथील महाराष्ट्र निसर्ग उद्यानातील तलावात काही दिवसांपूर्वी मगर आढळली. तलावाला लागून असलेल्या मिठी नदीपात्रातून मगर थेट तलावात आल्याने माणसांच्या सुरक्षेसाठी मगर पकडा अशी आग्रही भूमिका महाराष्ट्र निसर्ग उद्यान प्रशासनाने घेतली आहे. तर मगरीला पकडायचे की नाही यावरून प्रादेशिक वनविभाग आणि कांदळवन कक्ष यात नियोजनाच्या अभावामुळे अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.

( हेही वाचा : उर्फी जावेद वाद; चित्रा वाघ म्हणाल्या, राजकारण नको, हा विषय सामाजिक!)

पवई तलावातून मगर थेट मिठी नदीत!

पावसाळ्यात पवई तलावाचे पाणी ओसंडून वाहते. पाण्याच्या प्रवाहाने तलावातील जलपर्णी मिठी नदी ते थेट दादर चौपाटीपर्यंत वाहून येतात. गेल्यावर्षी मुंबईत ऑक्टोबर महिन्यातही पाऊस सुरु होता. पवई तलावातून मोठ्या संख्येने जलपर्णी दादर चौपाटीपर्यंत वाहून आल्या होत्या. त्याचवेळी मगर महाराष्ट्र निसर्ग उद्यानातील अधिकाऱ्यांना तलावानजीकच्या मिठी नदीपात्रात दिसून आली. यावेळी कांदळवन कक्षाच्या वनाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र निसर्ग उद्यानाला भेट दिली. मगरीला पकडण्यासाठी इतर उपाययोजनांसाठी प्रादेशिक वनविभागाकडून काम होईल, अशा प्रयत्नात कांदळवन कक्ष राहिले. सुदैवाने मगर महाराष्ट्र निसर्ग उद्यानात आली नाही. मगर दिसेनाशी झाल्याने उद्यानातील अधिकाऱ्यांनीही सुटकेचा निःश्वास सोडला.

अचानक मगर दोन महिन्यांच्या कालावधीनंतर मिठी नदीपात्रातील खारफुटीलगत पुन्हा दिसू लागली. उद्यानातील अधिकाऱ्यांनी तिला डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नदीपात्रात पाहिले. शुक्रवारी सकाळी पक्षीनिरीक्षणासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना तलावतील हालचालीवरून मगर तलावात आल्याचा संशय आला. दुर्बीणीच्या साहाय्याने तलावातील हालचाली जवळून टिपल्यानंतर नदीपात्रातील मगर आता तलावात आल्याची खात्री त्यांना पटली. पूर्ण वाढ झालेली मगर तलावात पाणी आणण्यासाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना धोकादायक ठरू शकते, या भीतीने अधिकाऱ्यांनी मगर पकडा अशी आग्रही भूमिका घेतली आहे. मगर तलावातच पकडली जावी, यासाठी नदीपात्रातील परतीचा मार्ग जाळी लावून बंद करण्यात आला आहे.

मगरीला पकडण्याची गरज नाही

मगर व्यवस्थित असल्याचे आमच्या टीमने प्रत्यक्षात घटनास्थळी पाहणी करून पाहिले आहे. मगरीला पकडण्याची गरज नाही. तिला नदीपात्रात परत जाण्यासाठी जाळे काढून टाकावे. मगर खारफुटीजवळ आढळून आल्याने हा भाग कांदळवन कक्षाकडे येतो. उपाययोजनांसाठी आम्ही त्यांना पत्र लिहिणार आहोत. अंतिम निर्णय कांदळवन कक्षाचा असेल.
राकेश भोईर, वनपरिक्षेत्रपाल, मुंबई (ठाणे प्रादेशिक वनविभाग)

सागरी किनाऱ्यावर आलेल्या वन्यप्राण्यांचा बचाव आम्ही करतो. मगरीचे प्रकरण ठाणे प्रादेशिक वनविभागाकडून हाताळले जाईल .
सुरेश वरक, वनपरिक्षेत्रपाल, मुंबई (उपनगर ) कांदळवन कक्ष

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.