मुंबईत गुरुवारपासून एसी लोकलचे तिकीट दर कमी होताच सामान्य प्रवाशांनी वाढत्या उन्हामुळे साध्या लोकलकडे पाठ फिरवून कूल लोकलमधून प्रवास केल्याचे पाहायला मिळाले. यापूर्वी जास्त तिकीट दरामुळे इच्छा असनाही अनेक सामान्य प्रवासी एसी लोकलमधून प्रवास करणं टाळत होता. मात्र गुरुवारीपासून कूल वातावरणात प्रवास करताना वेगळाच आनंद मिळत असल्याने नवीन प्रवाशांच्या चेहऱ्यावर समाधानकारक भावना दिसत होत्या.
(हेही वाचा – आगामी 20 दिवसांसाठी 1100 पॅसेंजर गाड्या केल्या रद्द)
एसी लोकलला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद
दरम्यान, सध्या मुंबईतील पारा ३४.४ अंशावर पोहोचला असून उन्हाने हैराण झालेले प्रवासी एसी लोकलने प्रवास करणं पसंत करत आहे. त्यामुळे एसी लोकलला प्रवाशांचा हळूहळू चांगला प्रतिसाद लाभत आहे. गुरुवारपासून ५० टक्के तिकीट दरात कपात असल्याने प्रवासीसंख्येत आणखी वाढ झाली आहे. बुधवारी दिवसभरात ३१०० प्रवासी होते, तर गुरुवारी दुपारपर्यंत हा आकडा २५४३ वर पोहोचला होता.
एसी टॅक्सीने प्रवास करणारे वळले एसी लोकलकडे
बोरिवली ते चर्चगेट आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (दादर- माहीममार्गे) असा तीन मार्गावरील एसी लोकलचा मासिक पास २०८५ रुपयांना मिळतो. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण मासिक एसी पास २१३५ रुपयांचा आहे. चर्चगेट ते बोरिवली या मार्गाचा पास ११७५ रुपये इतका आहे. अॅपआधारित टॅक्सीने बोरिवली ते चर्चगेट एका दिशेचे भाडे ९४१ ते १२५४ रुपये होते. परतीच्या प्रवासाचे भाडे १८०० ते २००० रुपयांपर्यंत आहे. अॅपआधारित एसी टॅक्सी सेवेचे दर वाढ केल्याने टॅक्सीने प्रवास करणारे प्रवासी एसी लोकला पसंती देताना दिसताय. हे प्रवासी मासिक, त्रैमासिक पास काढण्यावर भर देत आहेत. त्यामुळे एसी टॅक्सीने प्रवास करणारे प्रवासी आता एसी लोकलकडे वळले आहेत.
तिकीट दरात कपात केल्याने प्रवाशांना दिलासा
रेल्वे प्रशासनाने एसी लोकलच्या तिकीट दरात घट करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत होती. ऐन गर्दीच्या वेळीदेखील एसी लोकल रिकाम्या धावत असल्याने एसी लोकलमध्ये प्रवासी भार वाढवण्यासाठी तिकीट दरात कपात करण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानंतर आता रेल्वे प्रशासनाने एसी लोकलच्या तिकीट दरात ५० टक्क्यांची घट केली आहे. त्यामुळे मुंबईकरांना कूल लोकलमधून प्रवास करता येणार आहे. एसी रेल्वेच्या तिकीट दरात कपात केल्याने अनेक प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.