देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांच्या निकालानंतर गेल्या काही दिवसांपासून इंधन दरात वाढ झाली आहे. गेल्या चार दिवसांपासून सलग पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होत असल्याने सर्वसामान्यांवर आर्थिक भार पडत आहे. तसेच, इंधन दरात वाढ झाल्यानंतर वाहन चालकांना मोठा मनस्ताप होत आहे. दिवसेंदिवस पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. मात्र, हिंगोली जिल्ह्यात मात्र एक वेगळाच प्रकार घडला आहे. हिंगोलीत अशी एक अफवा पसरली ज्यामुळे पेट्रोल पंपावर तोबा गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले.
काय घडला प्रकार
शुक्रवारी सायंकाळी उशिरा हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. पेट्रोल भरण्यासाठी वाहनधारकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली असून तेथे धक्काबुक्की देखील झाली. पेट्रोलचे दर वाढणार असून पंप चालक काही दिवस पेट्रोल पंप बंद ठेवणार आहे, अशी अफवा शहरात पसरली होती. या अफवेमुळं पेट्रोल पंपावर एकच गर्दी झाली होती. ही गर्दी झाल्याचे पाहून पेट्रोल पंप चालक देखील हैराण झाले होते.
(हेही वाचा – हिजाब बंदीनंतर कर्नाटक सरकारचा आणखी एक मोठा निर्णय )
आवाहनानंतर गर्दी झाली कमी
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकारानंतर पंपावरील काम करणारे कर्मचारीदेखील संभ्रमात पडले होते. काही वाहन चालकांकडे विचारणा केली असता खरे कारण समोर आले. नंतर पंप चालकांनी स्पष्टीकरण देत कुठेही पेट्रोल पंप बंद होणार नाही. अफवांना बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले. या आवाहनानंतर काही तासांनी पेट्रोल पंपावरील गर्दी कमी झाल्याचे सांगितले जात आहे.