क्रूझ पार्टी प्रकरण: होती एवढ्या कोटींची डील

मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करणार असल्याचे सूत्रांकडून समजते तर या तपासत एनसीबीचा पंच प्रभाकर साईल याला फिर्यादी बनवून गुन्हा देखील दाखल करण्यात येण्याची शक्यता आहे.

क्रूझ रेव्ह पार्टी प्रकरणाला वेगळेच वळण लागत चालले आहे, या प्रकरणातील पंचां पैकी एक पंच फुटला असून त्याने स्वतःचा एक व्हिडिओ व्हायरल करून आर्यन खान प्रकरणी २५ कोटी रुपयांची डील झाली होती, त्यापैकी ८ कोटी रुपये एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांना जाणार होते असा सनसनाटी आरोप फरार असलेल्या किरण गोसावी यांचा अंगरक्षक प्रभाकर साईल याने केला आहे.

या आरोपाने एकच खळबळ उडवून दिली असून एनसीबीच्या या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र माझ्यावर करण्यात आलेल्या आरोपात काही तथ्य नसल्याचे सांगत वानखेडे यांनी हे आरोप फेटाळून लावले आहे.

(हेही वाचाः आरोग्य विभागाच्या परीक्षेचा सावळा गोंधळ थांबेना)

नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरोच्या मुंबई विभागाने २ऑक्टोबर रोजी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनस या ठिकाणी कॉर्डिलिया क्रूझवर होणारी रेव्ह पार्टी उधळून लावली. यात एनसीबीने १३ जणांना ताब्यात घेतले होते. ताब्यात घेतलेल्यांमध्ये शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान व त्याचा मित्र अरबाज खान आणि मूनमून धामेचा या दिल्लीच्या मॉडेलचा समावेश होता.

समीर वानखेडे यांनी सर्व आरोप फेटाळले

एनसीबीचे डीडीजी मुठा अशोक जैन यांच्याकडून स्पष्टीकरण. प्रकरण न्यायालयासमोर आहे. पंच असलेल्या प्रभाकर साईल यांनी त्यांना जे काही सांगायचं आहे ते कोर्टासमोर सांगावं सोशल मीडीयातून नाही, प्रभाकर साईल यांच अफीडेव्हीट एनसीबीच्या डिजीना देण्यात आलंय. यावर योग्य ती कारवाई करण्याची विनंती करण्यात आलीय. 
                                       मुठा अशोक जैन, डीडीजी, एनसीबी

एनसीबीने याप्रकरणी आर्यन खान,अरबाज आणि मूनमून या तिघांसह आठ जणांना ड्रग्स प्रकरणात अटक करून त्यांच्या विरुद्ध एनडीपीएस कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. अटक करण्यात आलेल्या ८ जणांकडून काही प्रमाणात ड्रग्स आणि रोकड जप्त करण्यात आली होती. एनसीबीने दाखल केलेल्या गुन्हयात एकूण ९ पंच/ साक्षीदार यांची साक्ष नोंदविण्यात आली होती, या मध्ये भाजपचा एक पदाधिकारी तसेच पुण्यात गुन्हा दाखल असलेला आरोपी किरण गोसावी व त्याचा अंगरक्षक प्रभाकर साईल यांचा समावेश होता.

दरम्यान, एनसीबीच्या या कारवाईतील पंचाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सवाल उपस्थित केला होता. एनसीबी विरुद्ध एनसीपी शीतयुद्ध सुरू असतानाच रविवारी एनसीबीच्या कारवाईतील पंच प्रभाकर साईल याने स्वतःच्या एका व्हिडीओ मधून गौप्यस्फोट केला.

किरण गोसावी याचा अंगरक्षक असणारा प्रभाकर साईल हा आर्यन खान प्रकरणातील एनसीबीचा नऊपैकी एक पंच आहे. आर्यन खानला या प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी २५ कोटींची डील किरण गोसावी याने केली होती, १८ कोटींवर ही डील फायनल करायची होती, त्यापैकी ८ कोटी रुपये एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांना जाणार होते असा सनसनाटी आरोप करण्यात आला आहे. तसेच प्रभाकर साईल ने २ऑक्टोबर रोजी झालेल्या क्रूझवरील कारवाई बाबत सविस्तर माहिती आपल्या व्हिडीओत दिली असून आपल्याकडून कोऱ्या पेपरवर स्वाक्षरी घेण्यात आली असल्याचा आरोपही केला आहे.

तसेच त्याने शेवटी किरण गोसावी हा मागील काही आठवड्यापासून बेपत्ता असून त्याचा कुठेही थांगपत्ता लागत नसून त्याचे काही बरेवाईट झाले असावे का? असा संशय व्यक्त करून माझ्याही जीवाला धोका असल्याचे साईल याने व्हिडीओ च्या माध्यमातून म्हटले आहे. प्रभाकर साईल याने केवळ व्हिडीओच नाही तर आपला सर्व जबाब स्टॅम्पपेपर टाइप करून त्याची सत्यप्रत तयार करून नोटरी ही केली आहे.

मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करणार असल्याचे सूत्रांकडून समजते तर या तपासत एनसीबीचा पंच प्रभाकर साईल याला फिर्यादी बनवून गुन्हा देखील दाखल करण्यात येण्याची शक्यता आहे, तसेच प्रभाकर याने तयार केलेली सत्यप्रत जबाब म्हणून घेऊ शकतात अशी माहिती मुंबई पोलीसातील अधिकारी यांचे म्हणणे आहे.

एक प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here