कोविड-19च्या उपचारांसाठी ‘या’ औषधाच्या मानवी चाचणीला सुरुवात

या चाचण्या यशस्वी झाल्यास रुग्णांसाठी किफायतशीर प्रभावी उपचारपद्धती प्रदान करणारा हा पर्याय ठरेल.

75

भारतीय वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद(सीएसआयआर) आणि लक्षई लाइफ सायन्सेस प्रा.लि. यांच्या सहकार्याने कोविड-19 उपचारांसाठी निक्लोसॅमाइडच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रत्यक्ष मानवी चाचण्यांची सुरूवात करण्यात आली आहे. रुग्णालयात दाखल असलेल्या कोविड -19 रुग्णांच्या उपचारासाठी निक्लोसॅमाईडची कार्यक्षमता, सुरक्षितता यांचे मूल्यांकन करण्यासाठी या चाचण्या सुरू केल्या आहेत.

सहज उपलब्ध होणारे औषध

पूर्वी निक्लोसॅमाईड वयस्कर, तसेच मुलांमधील टेपवर्म संसर्गाच्या उपचारांसाठी मोठ्या प्रमाणात वापरले जात असे. या औषधाची सुरक्षितता वेळोवेळी तपासली गेली असून वेगवेगळ्या प्रमाणात, विविध स्तरांवर मानवी वापरासाठी ते सुरक्षित असल्याचे आढळून आले आहे. सीएसआयआरचे महासंचालक डॉ. शेखर सी मांडे यांनी एसईसीच्या निक्लोसॅमाईड वापरुन प्रत्यक्ष मानवी चाचण्या करण्यासंबंधित शिफारसीबद्दल आनंद व्यक्त केला. हे औषध मूळ स्वरुपात (जेनेरीक) सर्वसाधारणपणे परवडणारे औषध असून, सहजपणे भारतात उपलब्ध आहे आणि म्हणूनच भारतातील जनतेसाठी ही सुविधा उपलब्ध करुन दिली जाऊ शकेल.

(हेही वाचाः राज्यातील कोविड मृतांची संख्या पार करणार ‘हा’ आकडा)

रुग्णांसाठी प्रभावी उपचार ठरेल

सीएसआयआर-आयआयसीटी हैद्राबादचे संचालक डॉ. श्रीवरी चंद्रशेखर यांनी या औषधांचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, या औषधातील महत्त्वाचा घटक(अॅक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट, एपीआय) आय.आय.सी.टी. मध्ये विकसित केलेल्या सुधारित तंत्रज्ञानावर आधारित असून, लक्षई लाइफ सायन्सेस तो बनवत आहे. प्रयोगशाळेतील या प्रभावी मानवी चाचण्यांमध्येही ते सहभागी आहेत. या चाचण्या यशस्वी झाल्यास रुग्णांसाठी किफायतशीर प्रभावी उपचारपद्धती प्रदान करणारा हा पर्याय ठरेल.

आपत्कालीन वापरासाठी मिळू शकते परवानगी

लक्षईचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राम उपाध्याय यांनी सांगितले की, येत्या 8 ते 12 आठवड्यांत हे काम पूर्ण होईल. भारतीय अभ्यासानुसार, क्लिनिकल चाचण्यांच्या दरम्यान तयार केलेल्या क्लिनिकल पुराव्यांच्या आधारे, आपत्कालीन वापरासाठी अधिकृत मान्यता मिळवली जाऊ शकते. जेणेकरुन कोविड -19 रुग्णांना उपचारांसाठी अधिक पर्याय उपलब्ध असतील.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.