सायबर हॅकरकडून थेट मुंबई सायबर पोलिस विभागाचा ईमेल हॅक करण्यात आला आहे. या ईमेलवरुन राज्यभरातील पोलिसांच्या अधिकृत ईमेलवर हॅकरकडून मेल पाठवले जात असून, त्यासोबत एक पीडीएफ फाईल पाठवली जात आहे.
ही पीडीएफ फाईल उघडू नये, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागाचे पोलिस अधीक्षक संजय शिंत्रे यांनी प्रत्येक पोलिस आयुक्त आणि पोलिस अधिक्षकांना केले असून, यासंबंधी पत्र पाठवण्यात आले आहे. पोलिस दलाचा महत्वाचा डेटा चोरी करण्याचा मनसुबा हॅकरचा असू शकतो. तसेच पाकिस्तान, दिल्ली आणि उत्तर प्रदेश येथून हे हॅकिंग झाले असल्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
असा येत आहे ईमेल
मुंबई पोलिसांच्या पूर्व प्रादेशिक सायबर विभागाच्या अधिकृत ईमेल आयडीवरुन राज्यातील पोलिस ठाण्यांच्या अधिकृत मेल आयडीवर एक फिशींग मेल पाठवण्यात आला आहे. या ईमेलमध्ये ‘टेररिस्ट बिहाइंड जेके अटॅक गनेड डाऊन इन मुंबई’ या आशयाचा इंग्रजी मेसेज आणि सोबत इंटेलिजन्स रिपोर्ट लिहून एक पीडीएफ फाईल पाठवण्यात आली आहे. हा ईमेल राज्यातील प्रत्येक पोलिस ठाणे, गुन्हे शाखा, तसेच शासकीय मेलवर पाठवण्यात येत आहे.
सायबर पोलिसांचे आवाहन
हा ईमेल फिशिंग मेल असून, अज्ञात हॅकरने पूर्व प्रादेशिक सायबर विभागाचा ईमेल आयडी हॅक करुन हा मेल पाठवला असल्याचे लक्षात येताच, मुंबई सायबर विभाग आणि महाराष्ट्र सायबर विभाग सतर्क झाले असून या प्रकारचा मेल आल्यावर त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात यावे, तसेच या मेलसोबत पाठवण्यात आलेली पीडीएफ फाईल कोणीही उघडू नये, असे आवाहन महाराष्ट्र सायबर सेलचे पोलिस अधीक्षक संजय शिंत्रे यांनी केले आहे. अज्ञात हॅकरने सायबर विभागाचा मेल आयडी हॅक करुन फिशिंग मेल पाठवले असून, पोलिस दलाचा डेटा चोरी करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community