सध्याच्या काळात सायबर क्राईमचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. सायबर गुन्हेगार विविध क्लृप्त्या करुन लोकांना चूना लावण्याचे काम करत आहेत. अलीकडे प्रसिद्ध सुपरमार्केट असलेल्या डी-मार्टची एक लिंक व्हॉट्सअपवर व्हायरल होत आहे. या लिंकद्वारे ग्राहकांना मोफत भेटवस्तू देण्याचा दावा करण्यात येत आहे. अशाप्रकारे व्हायरल झालेली ही लिंक बनावट असून, ग्राहकांनी आपली फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन पुणे सायबर पोलिसांनी केले आहे.
काय आहे बनावट लिंक मागचे सत्य?
व्हॉट्सअपवर व्हायरल होत असलेली लिंक ही नामांकित डी-मार्ट या सुपरमार्केटची असल्याचे भासवून, 20व्या वर्धापन दिनानिमित्त डी-मार्ट आपल्या ग्राहकांना मोफत भेटवस्तू देत असल्याचे त्यात सांगण्यात आले आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर एका वेब पेजवर 4 प्रश्न विचारले जातात किंवा एक स्पिन व्हील ओपन होते. या प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर किंवा स्पिन व्हील फिरवल्यानंतर 5 हजार रुपयांचे गिफ्ट कार्ड, तसेच काही वस्तू जिंकल्याचे सांगण्यात येते. तसेच ही लिंक 5 व्हॉट्सअप ग्रुप किंवा 20 मित्रांना शेअर करा असे सांगितले जाते. यावर विश्वास ठेऊन काही लोक ती लिंक फॉरवर्ड करतात. हे करत असताना लोकांकडून बँक डिटेल्स मागून सायबर गुन्हेगारांकडून त्यांची आर्थिक फसवणूक केली जाऊ शकते, असे पुणे ग्रामीण सायबर पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
सायबर जनजागृती – प्रेस नोट – #०२@DGPMaharashtra @MahaCyber1 @PuneCityPolice @Cyberdost pic.twitter.com/y6tJRrs5lK
— पुणे ग्रामीण पोलीस – Pune Rural Police (@puneruralpolice) August 20, 2021
पोलिसांचे आवाहन
अशा फसव्या लिंक ओपन करुन, बँकेसंबंधित ओटीपी क्रमांक शेअर करू नये, तसेच कोणतेही अनोळखी मोबाईल अॅप डाऊनलोड करू नये, असे आवाहन पुणे सायबर पोलिसांकडून करण्यात आले आहे. तसेच आपल्या फेसबूक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाऊंट्सचा पासवर्ड आपला मोबाईल नंबर न ठेवता त्यात अंक, अक्षरे आणि स्पेशल कॅरॅक्टर्सचा वापर करावा, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community